श्रीनगरमध्ये हिंसा भडकल्याने गोव्यातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या ५१ भाविकांसह देशभरातील तब्बल १० हजार यात्रेकरू श्रीनगर बसस्थानकावर गेल्या पाच दिवसांपासून अडकून पडले आहेत.
श्रीनगर येथे अडकून पडलेल्या गोव्यातील भाविकांपैकी उष्मा पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की दोन दिवसांपूर्वी आम्ही श्रीनगरला पोचलो. तेथून आम्हांला अमरनाथ यात्रेसाठी जायचे होते. पण अनंतनाग येथे लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार होण्याची घटना घडली. यानंतर श्रीनगरमधील फुटीरतावादी नेत्यांनी आपल्या समर्थकांना भडकावल्याने श्रीनगरमध्ये हिंसा उसळली आहे. त्यामुळे सध्या श्रीनगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. फुटिरतावादी जमावाने संपूर्ण श्रीनगर शहरालाच एकाप्रकारे वेठीस धरले आहे. त्यामुळे लोक बसस्थानकावर गेल्या दोन दिवसांपासून अडकून पडले आहेत.
गोव्यातील एकूण ५१ जणांचा त्यात समावेश असून त्यात युवक-युवती, महिला व एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. हे लोक अमरनाथ यात्रेसाठी जाणार्या भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या ‘लंगर’मध्ये गेल्या दोन दिवसांपासून राहत आहेत. लष्कराने शहराला वेढा घातलेला असून कुणीही बाहेर पडू नये, असे आदेश दिले असल्याचे पेडणेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना
सांगितले.