गोव्यातील सलोखा देशाला दिशादर्शक

0
7

>> पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार; मडगावातील जाहीर सभेत कोट्यवधींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व शीलान्यास

गोवा हे आकारमान व लोकसंख्येने भारतातील छोटे राज्य असले, तरी विविध धर्म-जाती-पंथाचे लोक येथे एकता व सलोखा राखून राहतात. त्यामुळे गोव्याच्या नागरिकांमधील ही एकता आणि सलोखा देशाला दिशा देणारा आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मडगाव येथील जाहीर सभेत काढले. गेल्या 10 वर्षांत भाजपच्या सुशासनामुळे गोवा स्वयंपूर्ण बनू शकला. डबल इंजिन सरकारमुळेच हे साध्य झाले, असेही मोदी म्हणाले. या सभेत पंतप्रधानांनी गोव्यातील 1330 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली.

मडगावातील कदंब बसस्थानकावर ‘विकसित भारत, विकसित गोवा 2047′ अंतर्गत जाहीर सभेत पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. भर दुपारी सुरू झालेल्या या सभेला विराट संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या सभेला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

पर्यावरण व परिषद पर्यटनास चालना
गोवा हे भारताचे पर्यटन केंद्र आहे. मनोवेधक समुद्रकिनारे आणि निसर्ग सौंदर्य यासाठी गोवा जगभर ओळखला जातो. देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात कोणत्याही हंगामात येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटू शकतात ही गोव्याची खासीयत आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी गोव्याची विशेषता विशद केली. गोव्याच्या पर्यटनाला यापुढे पर्यावरण पर्यटन, परिषद पर्यटन अशा नव्या दिशा दिल्या जातील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. गोवा ही आंतरराष्ट्रीय संमेलने, परिषदा, मुसद्द्यांच्या बैठका, चर्चासत्रे, आयोजित करण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. सरकार त्याला प्रोत्साहन देईल. त्यातून पर्यटनाला वाव मिळेल व जगात गोव्याची वेगळी ओळख होईल, असे पंतप्रधान म्हणाले. गोवा क्रीडा, ॲथलेटिक क्षेत्रात अग्रेसर आहे. फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे. त्या खेळालाही सरकार सर्वतोपरी मदत देत आले आहे असे त्यांनी नमूद केले.

‘स्वयंपूर्ण गोवा’ चे यश अभूतपूर्व
आज 1330 कोटी रुपयांचे प्रकल्प गोव्यात भाजपच्या डबल इंजिन सरकारने आणले आहेत. त्यात एनआयटी कुंकळ्ळी, जलक्रीडा प्रकल्प दोनापावला, कचरा व्यवस्थापन प्रकल्प काकोडा-कुडचडे या प्रकल्पांचे उद्घाटन, तसेच पणजी ते रेईश मागूस किल्ला रोपवे प्रकल्प, साळावली शेळपे 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येत असून, या प्रकल्पांमुळे स्वयंपूर्ण गोव्याला बळकटी मिळणार आहे. तसेच शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि स्वच्छता ही क्षेत्रेही मजबूत होणार आहेत असे पंतप्रधान पुढे म्हणाले. गोवा सरकारने राबवलेली स्वयंपूर्ण गोवा ही योजना देशात अभूतपूर्व आहे असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

सबका साथ, सबका विकास
गोव्यात कोणीही बेरोजगार राहू नये याकडे सरकार लक्ष देत आहे. भाजप सरकार हे ‘सबका साथ, सबका विकास’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व क्षेत्रात कार्यरत आहे. या अगोदर विविध पक्षांची सरकारे गोव्यात आली; पण विकास साधता आला नाही. गोव्यात भाजप सरकारने गेल्या 10 वर्षांत सुशासन देऊन विकास साधला. त्यामुळे स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न सकार होऊ शकले, असे मोदी म्हणाले.

सामाजिक न्याय हाच सर्वधर्मसमभाव
गोव्यात 100 टक्के नळाद्वारे घरांना पाणी, वीज जोडण्या, स्वयंपाकाचा गॅस आणि प्रत्येक घरात शौचालये पुरवली. राजकीय भेदभाव न करता ग्रामीण भागाचा विकास केला. सर्व केंद्रीय योजनांचा शंभर टक्के लाभ गोव्यात जनतेला होत आहे. हाच खरा सामाजिक न्याय असून हाच खरा सर्वधर्मसमभाव आहे असे पंतप्रधान म्हणाले. गोव्याच्या विकासासाठी ‘मोदींची गॅरंटी’ आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आश्वस्त केले.

पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटी
2014 च्या आधी केंद्रातील सरकारने पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यायला हवे होते; मात्र ते दिले नाही. आपल्या कार्यकाळात देशात महामार्ग, रेल्वेमार्ग, विमानतळांचा विकास करण्यात आला. 11 लाख कोटी रुपये खर्चून देशभरात महामार्गांचे जाळे विणण्यात आले. पायाभूत सुविधांसाठी केंद्रातील मागील सरकारकडून फक्त 2 लाख कोटी रुपये खर्च येत होते, तो आकडा आता 11 लाख कोटींपर्यंत गेला आहे, हे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजना आखल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेखाली 4 कोटी लोकांना पक्की घरे देण्यात आली आहेत. मत्स्योद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. किसान क्रेडिट कार्ड खाली कर्जाची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे, याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

गोव्याला बनवणार लॉजिस्टिक हब
गोव्याला लॉजिस्टिक बनविण्यात येणार आहे. लॉजिस्टिक हबसाठी विमानतळ, रेल्वेमार्ग, रस्ते व पूल यांचे विस्तृत जाळे आवश्यक आहे. त्यावरच डबल इंजिन सरकारने भर दिला आहे. मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवे राष्ट्रीय महामार्ग, नवीन रस्ते आणि पूल, रेल्वेमार्ग यामुळे गोवा राज्य लॉजिस्टिक हब बनण्यात मदत होणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

गोवा लवकरच बनेल शैक्षणिक केंद्र
गोव्याला शैक्षणिक हब बनवण्याचाही केंद्र सरकारचा मानस असून, त्या दिशेने पावले टाकली जात आहेत. कुंकळ्ळीतील एनआयटी संकुलामुळे गोव्यातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिक्षणाची सोय झाली आहे. नवनव्या शिक्षण संस्थांमुळे गोवा शैक्षणिक केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. शैक्षणिक हबमुळे देशभरातील विद्यार्थी गोव्यात येतील. परिणामी तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनामुळे गोवा स्वयंपूर्ण बनेल, असेही ते म्हणाले.