>> पद्मश्री पुरस्काराचे मानकरी संजय पाटील यांची प्रतिक्रिया; गोव्याच्या कृषी संस्कृतीला मिळणार चालना
गोव्यात कृषी हे एक दुर्लक्षित क्षेत्र आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ‘पद्मश्री’सारखा मोठा पुरस्कार जाहीर होणे मोठी बाब आहे. कृषी क्षेत्रात कार्यरत व्यक्तीला हा पुरस्कार जाहीर झाल्याने गोव्याच्या कृषी संस्कृतीला आणखी चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी आणि गोव्यातील आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जाणारे शिलवाडा-सावईवेरे येथील प्रगतशील शेतकरी संजय अनंत पाटील यांना काल व्यक्त केला. संजय पाटील हे सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते असून, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता.
प्रथमच गोव्यातील एखाद्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार म्हणजेच कुळागर संस्कृतीचा सन्मान असून, आपण केवळ एक प्रतीक आहे. केंद्र सरकारने आपल्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेतल्याचा खूप आनंद झाला आहे. गोव्यातील प्रयोगशील शेतीला निश्चितच चालना मिळणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
संजय पाटील यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतले असून, त्यानंतर ते गोवा बागायतदार या संस्थेत कामाला रुजू झाले. मात्र त्यांचे मन नोकरीत रमत नव्हते. घराच्या बागायतीचे काम पाहावे लागत होते. अखेर, बागायतीच्या कामात पूर्णपणे झोकून देण्यासाठी गोवा बागायतदार या संस्थेतील नोकरी त्यांनी सोडली आणि 1986 पासून पूर्णपणे बागायतीच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली. बागायतीच्या कामात पूर्ण झोकून देऊन काम केल्याचे मोठे फळ आता मिळाले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
वडिलांनी बागायतीमध्ये मनमोकळेपणाने काम करण्याची मोकळीक दिली होती. त्यामुळे बागायतीमध्ये नवनवीन प्रयोग सुरू करून बागायतीचा व्याप वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केला, असे पाटील म्हणाले.
बागायतीला पाणी मिळू लागले; पण उत्पादनात वाढ होत नसल्याने आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे सेंद्रीय पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पहिल्यांदा गुजरात येथील गुरू भास्कर सावे यांचे नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन घेतले. त्यानंतरच्या काळात कृषीतज्ज्ञ सुभाष पाळेकर व इतरांचे मार्गदर्शन घेतले. बागायतीसाठी खास जीवामृत या नैसर्गिक खताचा वापर करण्यास सुरुवात केली. गायीचे शेण आणि मूत्र यांचा वापर करून हे जीवामृत तयार केले जाते. या जीवामृतामुळे सुपारी, नारळ व इतर कृषी उत्पादनात वाढ होण्यास सुरुवात झाली. आता बागायतीसाठी लागणारे जीवामृत स्वतःच तयार करतो. बागायतीसाठी बाहेरील कुठल्याही खताचा वापर करीत नाही, असेही पाटील यांनी सांगितले. बागायतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना कुटुंबाकडे सुध्दा लक्ष द्यावे लागत होते. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून सर्व जबाबदाऱ्या निभावण्याचे काम केले. कुटुंबातील अन्य व्यक्तींकडूनही बागायतीच्या कामात मदत मिळाली, असेही ते म्हणाले.
राज्यातील युवा वर्गासमोर आपली बागायत एक मॉडेल म्हणून उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. युवा वर्गाने कृषी क्षेत्राकडे वळणे आवश्यक आहे, असेही पाटील म्हणाले.
संजय पाटील विविध पुरस्कारांचे मानकरी
कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची गोवा सरकारने दखल घेऊन 2013 मध्ये कृषी रत्न पुरस्कार देऊन संजय पाटील यांचा सन्मान केला होता. त्यानंतर 2014 मध्ये गोवा बागायतदार या संस्थेने उत्कृष्ट बागायतदार म्हणून पुरस्कार देऊन सन्मान केला. पाटील यांनी किसान संघाचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना राज्यात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी अनेक मार्गदर्शन शिबिरे सुध्दा घेतली.
डोंगरात खड्डे, तळी खोदून अडवले पाणी
घरची साधारण दहा एकर जमीन होती; मात्र ती जमीन डोंगराळ भागात होती. परिणामी बागायतीसाठी पाण्याची समस्या भेडसावत होती. ही समस्या सोडविण्यासाठी डोंगराळ भागात पावसाचे पाणी अडवून ठेवण्यासाठी खड्डे खोदण्यास सुरुवात केली. तसेच, डोंगराळ भागात तळी खोदून पाणी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. दोन ठिकाणी तळ्यांमध्ये पाणी मिळाले. त्यातील पाणी जलवाहिन्यांद्वारे साहाय्याने आणून ते बागायतीसाठी वापरण्यास सुरुवात केली, असे संजय पाटील यांनी सांगितले.