गोव्यातील लोकप्रतिनिधींसाठीही गणेशोत्सवाचे खास महत्व

0
91

गोव्यातील लोकप्रतिनिधींना सहसा स्वत:साठी अथवा स्वत:च्या कुटुंबीयांसाठी वेळ देणे त्यांच्या व्यस्त दैनंदिनीमुळे शक्य होत नसते. पण बहुतेक सर्वच हिंदू लोकप्रतिनिधी वर्षातून एकदा येणारा गणेश चतुर्थीचा सण मात्र आपल्या कुटुंबीयांसह साजरा करीत असल्याचे या लोकप्रतिनिधींनी सांगितले.
आमदार विष्णू वाघ हे भारतीय संस्कृतीचे एक चांगले अभ्यासक आहेत. हिंदू धर्मातील सर्व सणांविषयी त्यांना इत्यंभूत माहिती तर आहेच. शिवाय या सणात रस घेण्यास त्यांना आत्मिक समाधान मिळत असल्याचे काल त्यांच्याशी संवाद साधला असता दिसून आले.
हिंदू धर्मातील बहुतेक सण हे प्रेरणा देणारे व निसर्गाचे महत्त्व विषद करणारे असे असल्याचे ते म्हणतात. गणेशोत्सव हा तर प्रेरणाशक्ती देणारा सण आहे. पण अशा प्रेरणेची आज लोकांना गरजच नाही की काय असे वाटावे अशी एकूण स्थिती असल्याचे वाघ म्हणाले.
आपण अजूनही माटोळीचे सामान आणण्यासाठी डोंगरावर जातो. बाजारातून ते कधीही विकत आणत नसल्याचे वाघ म्हणाले. ढवळी येथील घरी आपण गणेशोत्सव साजरा करतो असे त्यांनी सांगितले.
आमदार कवळेकरांच्या घरी १० दिवसांचा गणपती
कॉंग्रेस आमदार चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर हे अत्यंत धडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात. गोव्यात कुणीही दहा दिवस गणेशोत्सव साजरा करीत नाहीत. मात्र बाबू कवळेकर हे त्याला अपवाद आहेत. दरवर्षी आठव्या दिवशी तर ते आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी भजन, आरती, फुगडी, रांगोळी व वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करीत असतात. त्यासाठी रोख बक्षिसेही ते ठेवतात.
मतदारसंघातील सुमारे ५ हजार लोकांना ते आठव्या दिवशी मेजवानीही देतात
गणेशोत्सवात परूळेकर उत्तम कासाळे वादक
पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांच्या निवासस्थानी एक वर्षी दीड दिवस तर एक वर्षी ५ दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा तो पाच दिवस होणार आहे. आपण धार्मिक स्वभावाचा असून आपल्या घरी असलेल्या शिवलिंगाची दर सोमवारी पुजा केली जाते. त्यात संपूर्ण कुटुंब सहभागी होत असते. गेल्या ४० वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. श्रावण महिन्यातील सोमवार तर वेगळ्याच भक्तिभावात साजरे केले जातात. आमचे सगळे कुटुंबच भाविक आहे. पत्नी साईबाबांचीही खूप भक्ती करते. चतुर्थीच्या दिवसांत मी शेजारच्या १०-१२ घरांत अन्य लोकांबरोबर आरत्यांसाठीही जातो. त्यांच्यात कांसाळेवादक म्हणून प्रसिध्द आहे. आरती पथकात गेली कित्येक वर्षे मी कांसाळे वाजवतो. ते वाजवण्यात माझा हात धरणारा गावात कुणी नाही. असा त्यांचा दावा आहे.
सुभाष फळदेसाई
आमदार सुभाष फळदेसाई हे सांगें तालुक्यातील कावरें पिर्ला येथील आपल्या मूळ गावी गणेशोत्सव साजरा करतात. या निमित्त त्यांचे बंधू, काका त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे ४० जणांची फौज एकत्र येते. त्यांच्या निवासस्थानी दीड दिवस अथवा पाच दिवस गणेशोत्सव असतो. यंदा तो पाच दिवस आहे. दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर हे तामसुली-माशेल येथील आपल्या मूळ घरी गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सवानिमित्त बंधू व अन्य नातेवाईक एकत्र येतात. आपण खूप धार्मिक व देवभोळे नसलो तरी आरत्यांत सहभागी होतो. शेजार्‍या जाणार्‍यांच्या घरीही आरत्यांसाठी जातो असे ते म्हणाले.
मंत्री श्रीपाद नाईक गणेशोत्सवानिमित्त खास गोव्यात
उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक हे देवभोळे नेते असून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आठवडाभराची रजा घेऊन ते गोव्यात आले आहेत.