गोव्यातील फेस्तकारांकडून उद्या पणजीत पुरुमेताच्या फेस्ताचे आयोजन

0
10

गोव्यातील फेस्तकारांच्यावतीने पणजीत बुधवार दि. 15 मे रोजी एका दिवसाच्या पुरुमेताच्या फेस्ताचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मारियाज फर्नांडिस यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यत हे फेस्त असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

पावसाळ्यातील बेगमीसाठीचे हे फेस्त असून, ह्या फेस्तामध्ये मिरच्या, खारवलेली मासळी, गावठी कांदे, तसेच पावसाळा संपेपर्यंत साठवून ठेवता येईल असे सगळे खाद्य जिन्नस उपलब्ध असतील. स्थानिक शेतकरी हे आपल्या शेतीत पिकलेला कृषीमाल घेऊन या फेस्तमध्ये सहभागी होणार असून, हा माल खरेदी करताना दर कमी करण्याची मागणी ह्या कष्टाळू शेतकऱ्यांकडे ग्राहकांनी करू नये, अशी सूचना फर्नांडिस यांनी यावेळी केली.

हे पुरुमेताचे फेस्त पणजी महापालिकेच्या पणजी शहरातील उद्यानात भरणार आहे. पणजी महापालिकेने या फेस्तासाठी सहकार्य केले आहे. मात्र, ह्या फेस्तासाठी प्रायोजक नसून लोकांच्या मदतीने फेस्ताचे आयोजन करण्यात आल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

दिव्यांगांसाठी काम करणारे एक समाज कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत हे यावेळी बोलताना म्हणाले की, या फेस्तमध्ये दिव्यांगांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे हे फेस्त सर्वसमावेशक असे ठरणार असून, त्यासाठी महापालिकेतील उद्यानात असलेली महिला व पुरुषांसाठीची शौचालये ही दिव्यांगांसाठी प्रवेश सुलभ बनवण्याचे काम आमच्या विनंतीवरून पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी हाती घेतले असल्याचे ते म्हणाले.

गोव्याचे पारंपरिक वाद्य असलेल्या घुमट वाद्याला गोमंतकीयांनी केलेल्या प्रयत्नांमुळे भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) लवकरच प्राप्त होणार असून त्यासाठी गोवा विद्यापीठ प्रयत्नरत असल्याचे कामत यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर या फेस्तामध्ये घुमट वाद्याला खास स्थान देण्यात येणार असून, घुमट वादनाचा कार्यक्रमही संपन्न होणार असल्याचे कामत यांनी यावेळी स्पष्ट केले. घुमटसाठी घोरपडीच्या कातडीचा वापर केला जाऊ नये, यासाठी आम्ही मोहीत हाती घेतली होती. त्यामुळे परत एकदा दिवाड व चोडण बेटांवर घोरपडींची संख्या वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमच्या फेस्तामध्ये घोरपडीच्या कातडीचा वापर केलेल्या घुमटांचा वापर करण्यात येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना डॉ. ग्वेंडोलीन द ऑर्लेन्झा म्हणाल्या ही, या पुरुमेताच्या फेस्तनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातील. गोव्याचे नैसर्गिक वैभव म्हणजे येथील काजू, आंबा व अन्य बागायती व वृक्षवल्ली होय, असे सांगून हे वैभव टिकवणे व त्यासाठी ह्या झाडांची संख्या वाढवणे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

अन्य महोत्सवांचेही आयोजन
कृषी खात्याच्या मदतीने फेस्तकार लवकरच अन्य काही छोट्या-मोठ्या फेस्तांचे आयोजन करणार असून, सर्वांत प्रथम मध महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. मधमाशांचे संगोपन या विषयासंबंधी जागृती करणे हा मध महोत्सव आयोजित करण्यामागील उद्देश असल्याचे मारियाज फर्नांडिस यांनी सांगितले.