गोव्यातील ‘दंगल’!

0
105

आगामी राज्य विधानसभा निवडणुकीचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यावेळी विरोधकांशी एकाकी लढत देणार आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांची युती, दुसरीकडे होऊ घातलेली कॉंग्रेस – गोवा फॉरवर्ड – राष्ट्रवादी कॉंग्रेस – युनायटेड गोवन्स यांची संभाव्य युती आणि दिल्लीची पुनरावृत्ती घडवण्याचे स्वप्न पाहणारा आम आदमी पक्ष असा प्रामुख्याने एकंदर सामना असेल असे तूर्त दिसते. निवडणूक जवळ आली की पक्षांतरे, कोलांटउड्या हे सर्रास चालते, तसे ते यावेळीही दिसले. निवडणूक म्हटले की, केवळ जिंकण्याची क्षमता हाच निकष लावला जात असल्याने तत्त्वे, मूल्ये आदी गोष्टींशी अर्थातच कोणाचे काही सोयरसुतक नसते. त्यामुळे शैक्षणिक माध्यम प्रश्नी कॉंग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयात प्रत्यक्ष सहभागी असलेला आणि त्या विरोधात तेव्हा आणि नंतरची पाच वर्षे अवाक्षर न काढलेला मगो पक्ष हातमिळवणी करायला गोवा सुरक्षा मंचाला चालतो; हायकमांड संस्कृतीविरोधात आवाज उठवत गोव्याच्या अस्मितेच्या रक्षणाची भाषा करीत स्थापन झालेल्या गोवा फॉरवर्डला कॉंग्रेसशी संगत करणे वावगे वाटत नाही; किंवा पक्षातून हकालपट्टी केलेल्या बाबूश मोन्सेर्रात यांच्या युनायटेड गोवन्सला पुन्हा जवळ ओढण्यात कॉंग्रेसलाही हरकत दिसत नाही. सगळ्यांना हवी आहे ती सत्ता आणि त्यासाठी काहीही करण्याची या सगळ्या राजकीय पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची तयारी आहे. या सगळ्या आघाड्यांच्या गदारोळामध्ये उद्या प्रत्यक्ष निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाची सत्ता आली नाही तर काय गोंधळ उडेल याची कल्पनाही करवत नाही. काही सत्ताकेंद्रांची मोर्चेबांधणी एव्हानाच सुरू झालेली आहे. उदाहरणार्थ, बाबूश मोन्सेर्रात हे जरी युनायटेड गोवन्सतर्फे पणजीत लढणार असले, तरी त्यांची पत्नी जेनिफर, जुने सहकारी टोनी आणि मित्रवर्य फ्रान्सिस सिल्वेरा यांना कॉंग्रेसची उमेदवारी जवळजवळ निश्‍चित असल्याने त्यांच्या मनासारखे निकाल लागले तर हा गट हा एक दबावगट ठरेल. ढवळीकर बंधू, राणे पिता पुत्र, कवळेकर दांपत्य, मोन्सेर्रात दांपत्य मंडळी निवडून आली तर जोडतोडीच्या राजकारणातील ते दबावगट असतील हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. सत्ताधारी भाजपालाही असंगाशी संग करण्यात काही वावगे वाटले नाही. त्यामुळे आपणच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लगावले, त्यांना पक्षाची दारे बिनधास्त खुली करण्यात आली. श्रीपाद नाईक आणि डॉ. विल्फ्रेड मिस्कितांनी त्याविरोधात आवाज उठवला असला तरी निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधाचा हा स्वर दुबळा ठरतो आहे. आपला पक्ष ‘एकला चलो रे’ चा मार्ग स्वीकारून स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आलेल्या प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरोंना बाजूला काढून कॉंग्रेस महाआघाडीच्या वाटाघाटी रंगात आलेल्या आहेत. गेल्यावेळी कॉंग्रेसच्या पराभवास ज्यांची घराणेशाही एक कारण ठरली, ते चर्चिल आलेमाव यावेळी राष्ट्रवादीतर्फे बाणावलीतून लढत आहेत, एकेकाळचे राष्ट्रवादीचे नीळकंठ हळर्णकर यावेळी कॉंग्रेसतर्फे थिवीतून लढणार आहेत, गेल्यावेळचे कॉंग्रेस उमेदवार मावीन आणि मडकईकर यावेळी भाजपातर्फे लढणार आहेत. मतदारांची मती गुंग करणार्‍या या जोडतोडीच्या राजकारणाने वरची पट्टी गाठायला आता सुरूवात झाली आहे. सत्ता सोपान गाठण्यासाठी आम आदमी पक्षाला सरकारच्या योजनांना दुप्पट करण्याचे आमीष दाखवावे लागलेले दिसते आहे. एकूण काय, तर जो तो काहीही करून गोव्याचे सत्तासन ग्रहण करायला आतुर आहे, उतावीळ आहे. या सार्‍या रणधुमाळीतून, मंथनातून शेवटी मतदारांच्या हाती काय लागणार हाच मोठा गहन प्रश्न आहे.