चीनमधून आलेल्या व कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आलेल्या ‘त्या’ विदेशी इसमाला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे, असे काल गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.
या विदेशी नागरिकाच्या लाळेचा नमुन्याचा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेला अहवाल हाती आला असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २८ जानेवारी रोजी सदर विदेशी नागरिकाला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून गोमेकॉत विशेष विभागात भरती करण्यात आले होते. आता त्याचा अहवाल नकारार्थी आलेला असल्याने त्याला डिसचार्ज देण्यात येणार असल्याची माहिती बांदेकर यांनी दिली.
दरम्यान, अन्य सहा संशयित रुग्णांवरही लक्ष ठेवण्यात आलेले असले तरी त्यांना गोमेकॉत भरती करण्यात आलेले नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.