- – शंभू भाऊ बांदेकर
वर्षानुवर्षे गणपतीच्या भक्ती-पूजनात लोकांची भर पडत असल्यामुळे तो खर्या अर्थाने ‘लोकदेव’ आहे. अर्थाविण गणपती पुजायचा राहिला असा प्रसंग कधीच कुणावर आलेला नाही. तो तसा कधीच येणार नाही ही भावना त्या सुखकर्ता व विघ्नहर्ता गणरायाच्या कृपाशीर्वादामुळे वाढीस लागली आहे.
आपल्या भारत देशात श्रीगणेशाचे प्रस्थ आणि महत्त्व फार मोठे आहे. श्रीगजानन हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे ही भावना दिवसेंदिवस दृढ होत चालली आहे. म्हणूनच भारतात विद्यारंभ, विवाह, प्रतिष्ठापना, गृहप्रवेश, यज्ञयाग, श्रीसत्यनारायण पूजा आणि श्रीशारदोत्सव इत्यादी उत्सवांचा प्रारंभ श्रीसिद्धिविनायकाची पूजा करून केला जातो. इतकेच नव्हे तर भाद्रपद चतुर्थीला श्रीमंगलमूर्ती गणरायाची पूजा करण्याआधी आद्य गणपतीची पूजा केली जाते.
ही परंपरा भारत पारतंत्र्यात होता आणि गोवा पोर्तुगीज अमलाखाली होता तेव्हापासून ते आजतागायत सुखेनैव चालू आहे. श्रीगणपतीबाप्पावरची श्रद्धा, भक्ती व त्याचे माहात्म्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असल्यामुळेच कौटुंबिक गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सवांत भर पडत चालली आहे व पुढे भर पडतच जाणार आहे; आणि याला आपला गोवाही अर्थातच अपवाद नाही.
गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि अडाणी, अशिक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात गणेशपूजन हे असतेच असते. एकत्र कुटुंब पद्धतीतील माणसे कामधंद्यानिमित्त किंवा इतर कारणांमुळे गावाबाहेर असली, परगावी असली किंवा परदेशातसुद्धा असली तरी गणेशोत्सवातील गणपती पूजेच्या निमित्ताने एकत्र येतात. परदेशस्य व्यक्तींना काही कारणास्तव येणे शक्य नसेल तर मूळ गणपतीला आपला नैवेद्यासाठीचा वाटा पाठवून तर देतातच, पण जेथे असतील तिथे त्या दिवशी शक्य झाल्यास गणपतीची मूर्ती पुजून किंवा त्या दिवशी संपूर्ण शाकाहारी राहून श्रीगजाननाच्या पूजाअर्चेत लीन होतात व आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपतीबाप्पाला शरण जातात.
वर्षानुवर्षे गणपतीच्या भक्ती-पूजनात लोकांची भर पडत असल्यामुळे तो खर्या अर्थाने ‘लोकदेव’ आहे अशी भक्तजनांची भावना आहे. गण म्हणजे समुदाय किंवा सैन्य आणि पती म्हणजे त्याचा म्होरक्या किंवा नेता. या अर्थाने ‘गणपती’ हा महान योद्धा आहे. अशा या गणपतीबाप्पाचे वेगवेगळ्या पुराणांत श्रीगणेश, विनायक, मयूरेश, गजानन, हेरंब, धुम्रकेतू, लंबोदर असे वेगवेगळ्या नावांचे वेगवेगळे अवतार वर्णिले आहेत. प्रत्येक युगात या गणपतीचं वेगळं रूप असतं. तरी धर्मरक्षक, दुःखहर्ता तथा विघ्नहर्ता आणि सुखकर्ता हे गणेशाचं रूप सर्वमान्य झालं आहे आणि या रूपाला, या अवताराला भाळूनच सर्व जातीधर्माचे लोक या गणरायापाशी श्रद्धेने, भक्तीने आकर्षिले जातात.
गोव्यातील गणेशचतुर्थी ही जातीपातीनुसार, प्रथानिरूप आणि रूढी-परंपरांनुरूप साजरी केली जाते व यामुळेच त्यात वैविध्य दिसून येते. काहीजण कागदाचा गणपती करतात, तर काहीजणांचा आग्रह हा चिकणमातीच्याच गणपतीचा असतो, तर काहीजणांना प्लास्टर ऑफ पॅरिसची हलकीफुलकी मूर्ती मानवते. काहीजणांना गणपती हा आपल्या आवडत्या सिंहासनावरच बसलेला हवा असतो, तर काहीजणांची आवड ही श्रीगणेशाच्या मूर्तीबरोबरच शिव-पार्वती, श्रीदत्तात्रेय, श्रीमहाविष्णू आदी देवदेवतांनी नटलेला हवा असतो. काहीजणांचा गणपती दीड दिवसाचा असला तरी मूर्ती भव्य-दिव्य हवी असते, तर काहीजणांचा कौटुंबिक गणपती पाच दिवसांचा असला तरी मूर्ती आकाराने छोटी पण रंगकामात उजवी हवी असते. बाटाबाटीनंतरही काही ख्रिस्ती आपल्या मूळ गावी- मूळच्या घरी जाऊन चतुर्थीच्या आनंदात सहभागी होतात व हे गोव्यातील एक खास वैशिष्ट्य होऊन गेले आहे.
गणेशचतुर्थी हा येथील हिंदू समाजातील अठरापंगड जाती-धर्मातील लोकांचा सर्वात मोठा व महत्त्वाचा सण. गरिबातला गरीब माणूससुद्धा या सणासाठी हातात पै-पैका नसला तरी घाबरून किंवा भांबावून जात नाही. तो दयाघन परमेश्वर सर्वकाही यथासांग पार पाडीलच, शिवाय गतवर्षापेक्षा हा गणेशोत्सव जास्त थाटामाटात साजरा करायला आम्हाला बळकटी देईल अशी श्रद्धा असते व जसजसा हा उत्सव जवळ येत जातो तसतशी त्याची श्रद्धा सकारात्मक रूप घेत असते. आपल्याला सणासुदीला पैशांची चणचण भासू नये यासाठी देव माणसाच्या रूपात आपल्याकडे कुणाला तरी पाठवून आपले हात बळकट करतो. एखाद्याकडे उसनवार पैसे मागितले तर तो नकार तर देणार नाही ना अशी भावना मनात घर करून राहावी व त्याने हटकून आपल्याला मदत करावी असे अनुभव असंख्य भाविकांना आलेले असतात. आणि म्हणूनच अर्थाविण गणपती पुजायचा राहिला असा प्रसंग कधीच कुणावर आलेला नाही. तो तसा कधीच येणार नाही ही भावना त्या सुखकर्ता व विघ्नहर्ता गणरायाच्या कृपाशीर्वादामुळे वाढीस लागली आहे.
एकदा दिनदर्शिकेवर गणेशचतुर्थीचा दिवस पाहिला की मग दोन-अडीच महिने आधीच आपल्या आवडीची गणेशाची मूर्ती पसंत केल्यापासून घराची रंगरंगोटी, आसपासचा परिसर स्वच्छ व सुशोभित करणे, प्रत्यक्ष पूजनाची जागा विशेषप्रकारे सजवणे, रंगवणे, पूजनाच्या आसपास कोणती चित्रे रंगवायची, कोणत्या रंगाच्या कोणत्या रांगोळ्या काढायच्या येथपासून तो चतुर्थीनिमित्त चार-पाच दिवस अगोदर येणार्या कुटुंबातील माणसांसाठी लागणारे जीवनावश्यक साहित्य, त्यांच्या उठण्या-बसण्यासाठी घरातील इतर खोल्यांमध्ये किंवा इतरत्र करावयाची सोय आदी गोष्टी कोणत्याही ताणतणावाशिवाय किंवा डोक्याला विशेष ताण न देता सार्या ठरल्याप्रमाणे केल्या जातात व याकामी घरातील बालगोपाळांपासून म्हातार्याकोतार्यांपर्यंत सर्वजण आपणहून उत्साहाने कामात खारीचा वाटा उचलतात. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत आहे असे लक्षात आल्यावर घरातील लहानथोर मग गुणगुणत असतात- ‘तूच कर्ता आणि करविता, शरण तुला भगवंता…’ काहीजण तर चक्क ‘सुखकर्ता, दुःखहर्ता वार्ता विघ्नाची| नुरवीपुरवी प्रेम कृपा जयाची’ने वातावरण प्रसन्नमय करून सोडतात.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथील गणपतीच्या मूर्तीपूजनातही अनेकजणांत अनेक प्रकारच्या प्रथा-रूढी आहेत. काहीजणांत वर्षातून तीन वेळा ‘माती’ पूजण्याची प्रथा आहे. त्यात प्रथम नागपंचमीला नागाची मूर्ती, नंतर गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाची मूर्ती व नंतर गणपतीची मूर्ती. अर्थातच या मूर्ती मातीच्याच करवून घेतलेल्या असल्यामुळे त्याला ‘तीन खेपा’ माती पुजणे असे म्हटले जाते. काही घराण्यांत चतुर्थीच्या पहिल्या दिवशी ‘हरितालिका पूजन’ करण्यात येते. काहीवेळा चतुर्थी व हरितालिका पूजन एकाच दिवशी येतात तेव्हा हा कार्यक्रम एकाच दिवशी करण्यात येतो.
काहींच्या घरी मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी कागदावरील गणपतीच्या चित्राचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशा लोकांच्या सोयीसाठी गणपतीची लाल रंगातील चित्रे ठरावीक दुकानांत उपलब्ध असतात. बाटाबाटीच्या वेळी किंवा एखादे अवर्षण वगैरे आल्याने वारंवार स्थलांतर करावे लागल्याने ही अशी चित्रांचा गणपती पूजनाची प्रथा पडली असे सांगण्यात येते व ही प्रथा-परंपरा काही घराण्यांमध्ये तशीच अजूनही कायम राहिली आहे.
गोव्यात मग तो कुटुंबातील गणपती असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असो, सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन दुजाभाव, मतभेद विसरून मनोभावे पूजन, भजन, भोजन, आरती करताना दिसतात.
कुटुंबातील गणपती हा दीड दिवसापासून पाच, सात किंवा नऊ दिवस असतो, तर सार्वजनिक गणेशोत्सव अकरापासून एकवीस दिवसांपर्यंत असतो. वर्षपद्धतीनुसार यंदा ही साजरी होणारी गणेशचतुर्थी सर्व धर्मियांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वांसाठी अमृतकाल घेऊन येवो, अशी त्या जगन्नियंत्या श्रीगणेशापाशी विनम्रपणे प्रार्थना!