गोव्यातील कोणत्याही राजकीय पदाच्या स्पर्धेत आपण नाही

0
2

>> केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांकडून स्पष्ट; राज्यपाल पिल्लई यांची घेतली सदिच्छा भेट

मला गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’ होती ही केवळ अफवा आहे. गोव्यातील कोणत्याही राजकीय पदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचा खुलासा केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी काल काबो राजभवनवर पत्रकारांशी बोलताना केला.

केरळच्या राज्यपालपदी निवड झालेल्या राजेंद्र आर्लेकर यांनी काल दोनापावला येथील काबो राजभवनवर केरळचे नागरिक असलेले गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आर्लेकर म्हणाले की, मला गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती ही अफवा असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. माझी केरळच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर ही अफवा होती यावर एकाप्रकारे शिक्कामोर्तबच झाले. गोव्यातील कोणत्याही राजकीय पदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

पी. एस. श्रीधरन पिल्लाई यांच्याशी आपण केरळबाबत चर्चा करून माहिती मिळवली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गोव्याच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आर्लेकर म्हणाले. पिल्लई यांच्याशी आपण केरळचे पर्यटन व अर्थव्यवस्था याबाबत चर्चा केल्याचे आर्लेकर यांनी स्पष्ट केले. गोव्याप्रमाणेच केरळ हे राज्य देखील आमचेच आहे, असे सांगून तेथे आपण कुणाला शिकवायला किंवा आज्ञा द्यायला चाललो नसल्याचे ते म्हणाले. केरळ सरकारला आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आर्लेकर अभ्यासू नेते : पिल्लई
राजेंद्र आर्लेकर यांच्याविषयी बोलताना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे म्हणाले की, राजेंद्र आर्लेकर हे एक अभ्यासू असे नेते आहेत. केरळमध्ये ते सर्वांना न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीत राजभवनला लोकभवन बनवण्याचा प्रयत्न केला. राजभवनच्यावतीने लवकरच येथील गरजू व्यक्तींना अन्न व कपडे देण्याची योजना सुरू करणार असल्याचे पिल्लई म्हणाले.