मुलाखत ः संदीप मणेरीकर
काल रविवारी पणजी येथील हॉटेल विवांतामध्ये प्रख्यात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची घेतलेली मुलाखत…
प्रश्न ः आपण संगीत मैफलीची सुरुवात कधीपासून केली?
उत्तर ः वयाच्या सातव्या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त पहिली मैफल झाली. मात्र त्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी मोठी मैफल झाली आणि त्यानंतर खर्या अर्थाने गायनाला सुरुवात केली.
प्रश्न ः आपल्याला संगीत मैेफल आणि संगीत नाटक असे दोन पर्याय दिले तर आपण कशाची निवड कराल?
उत्तर ः अर्थात संगीत मैफल. मी आता संगीत नाटकांत काम करण्याचं बंदच केलंय. कारण आताची पिढी संगीत नाटकं म्हणतात त्या गीतांची पार्श्वभूमी जाणून घेऊन ती गीतं म्हणत नाही असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांनी गाणी म्हणावीत अशी माझी इच्छा होती. ती आता कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे पूर्ण झाली असं मला वाटतं. त्यामुळे आता मी नाटकात काम करण्याचं बंद केले आहे.
प्रश्न ः गोवा आणि गोव्यातील कलाकारांबद्दल काय सांगाल?
उत्तर ः गोवा ही कलाकारांची भूमी आहे. इथल्या मातीतच कला रुजलेली आहे. आणि इथल्या कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर इथल्या कलाकारांना खरंच देवाचे आशीर्वाद आहेत. ही भूमीच अशीच पावन आणि मंगल आहे. म्हणूनच इथे मोठमोठे कलाकार जन्माला आले. पं. जितेंद्र अभिषेकीबुवा, रामदास कामत, पं. प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, किशोरीताई आमोणकर असे कितीतरी कलाकार या मातीत जन्माला आले. याचं कारण ही भूमी पवित्र आहे.
प्रश्न ः आपला मी वसंतराव हा चित्रपट कधी येतोय?
उत्तर ः हो.. तो आता एक एप्रिलमध्ये येतोय. २०२० मध्ये तो येणार होता परंतु कोरोना महामारीमुळे राहिला. तसंच तो चित्रपटगृहातच प्रदर्शित व्हावा अशी इच्छा होती. त्यामुळे तो आता एप्रिलमध्ये येईल.
प्रश्न ः तुमचे आवडते कलाकार कोण?
उत्तर ः कुमार गंधर्व हे आवडते आहेतच. शिवाय माझे आजोबा पं. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, विदुषी किशोरीताई आमोणकर असे कलाकार आहेत ज्यांचं गाणं मला आवडतं.
प्रश्न ः तुमचं एखादं असं कुठलं स्वप्न आहे की जे जे राहिलंय?
उत्तर ः खरं तर आता कुठलं नाही. परंतु नाटक, चित्रपटाद्वारे तरुण पिढीत नाट्यगीताची आवड निर्माण करावी हे होतं. पण कट्यारनंतर नव्या पिढीत गायनाची ओढ निर्माण झाली. शास्त्रीय संगीताचा प्रसार होतोय. तो व्हावा हेच माझं खरं तर स्वप्न होतं.
प्रश्न ः आपल्याला संगीताच्या प्रकारातील कोणता प्रकार आवडतो?
उत्तर ः अर्थात प्रथम शास्त्रीय संगीत. त्यानंतर नाट्यगीत किंवा इतर प्रकार.
प्रश्न ः आपण कोणत्या प्रकारची गाणी ऐकता?
उत्तर ः सगळ्या प्रकारची. आणि गायकाने प्रकारची गाणी ऐकली पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे.
प्रश्न ः आपण गायक बनला नसता तर कोण झाला असता?
उत्तर ः मी तबलावादक झालो असतो.
प्रश्न ः तुम्ही चित्रपट पाहता का?
उत्तर ः हो. मी सगळ्या प्रकारचे चित्रपट बघतो. जुने, नवे. अगदी हॉररसुद्धा बघतो.
प्रश्न ः कुठली गोष्ट आवडत नाही किंवा कुठल्या गोष्टीचा राग येतो?
उत्तर ः मला खोटेपणा अजिबात आवडत नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला जे आवडत नाही ते मी तोंडावर सांगतो. पण खोटेपणा करणार नाही.
प्रश्न ः गोव्यात आपण इतक्या वेळा आलात. एखादी गोव्याबद्दलची चांगली आठवण सांगा.
उत्तर ः चांगली आठवण म्हणजे काल शनिवारचीच सांगता येईल. शनिवारी रात्री माशेल येथे बीग बी हॉलमध्ये झालेल्या मैफलीला जवळ जवळ अडीच ते तीन हजार प्रेक्षक उपस्थित होते. एका गायनाच्या मैफलीला अशी गर्दी होणं हा गायकासाठी सन्मानच असतो.
प्रश्न ः तरुण पिढीला काय सांगू इच्छिता? विशेषतः गायनाबद्दल?
उत्तर ः गायकाला रियाज महत्त्वाचा आहे. आपण दिवसातून तीनवेळा जेवण घेतो. तेही न विसरता. तसा रियाज झाला पाहिजे. न विसरता. शेवटी रियाजामुळे गायकाचा गळा आणि आवाज दोन्हींवर संस्कार होत असतात. आवाजाला धार येते. अशा अनेक गोष्टींसाठी रियाज महत्त्वाचा आहे.