गोव्यातील अपघात ः कारणे आणि उपाय

0
32
  • उदय म्हार्दोळकर

अपघात टाळायचे असतील तर वाहतूक खाते, सार्वजनिक बांधकाम खाते व पोलीस यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. गृहमंत्री, वाहतूक मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी नियमितपणे बैठका घेऊन योग्य नियोजन केल्यास अपघातांची संख्या कमी होऊ शकते. पूर्वी रस्ते अरुंद असताना अपघात कमी होत असत; आता रस्ते प्रशस्त झाल्यानंतर तर अपघातांची संख्या खूपच वाढली आहे, असे दिसून येते. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी योग्य आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

गोव्यात सध्या रस्ता अपघातांची मालिकाच सुरू आहे. गेल्या महिन्यापासून सुरू झालेले वाहन अपघातांचे दुष्टचक्र थांबायचे नावच घेत नाही. दर दोन दिवसांनी एकतरी अपघात होतच आहे व लोकांचे बळी जात आहेत. ही खरेच गंभीर आणि चिंतेची बाब आहे. गेल्या महिन्यात बाणस्तारी पुलाजवळ मार्सिडीज कारला झालेला भीषण अपघात संपूर्ण गोव्याला हादरवून सोडणारा होता. त्या अपघातात तिघांचे नाहक बळी गेले.
म्हार्दोळ पोलीस चौकीचा दर्जा वाढवून पोलीस स्थानकात रूपांतर करण्यात आल्यानंतर हे पहिलेच अपघातप्रकरण त्यांच्याकडे आले होते. परंतु त्यांना ते नीट हाताळता आले नाही. स्थानिक लोक संतप्त बनले. अपघातास जबाबदार असलेल्या जोडप्याला पोलिसांनी आपल्या वाहनातून घरी सोडले. गुन्हा नोंदविण्यास विलंब लावला. लोकांनी रेटा लावल्यामुळे व कोर्टाच्या दबावामुळे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविणे गृहखात्याला भाग पडले. राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आरोप झाले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असे लोकांना वाटते. मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहन हाकल्यामुळे हा भीषण अपघात झाला. मृतांच्या तसेच जखमी झालेल्या कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई मिळायला हवी.

गेल्या रविवारीच पर्वरी महामार्गावर झालेल्या आणखी एका भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. मेरशी येथे एका कौटुंबिक समारंभाला उपस्थित राहून वरील मंडळी रात्री दीडच्या सुमारास पर्रा येथे परत येत असताना वरील भीषण अपघात झाला. कार भरवेगात होती असे सांगण्यात येते. चालकाचा ताबा सुटला व कारने एका झाडाला जोरदार धडक दिली.

कलंगुट येथे अलीकडेच दिल्लीतील एका पर्यटकाने दारूच्या नशेत गाडी चालवत रस्त्याकडेला पार्क केलेल्या चार दुचाकींना धडक दिली. सुदैवाने तेथून चालत जात असलेल्या लोकांनी रस्त्याच्या बाजूला उड्या टाकून स्वतःचे प्राण वाचविले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एका बसचालकाने रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या महिलेला धडक दिल्याने तिला आपला उजवा पाय गमवावा लागला. असे अपघात चालूच आहेत. दुचाकींना अपघात होऊन गेल्या काही महिन्यांत अनेक युवकांनी आपले प्राण गमावले आहेत. म्हापशातील करासवाडा व पेडे जंक्शनवर नित्यनेमाने अपघात चालूच असतात. अपघाताची यादी द्यायला गेल्यास जागा पुरणार नाही. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीची समोरासमोर धडक होऊन काहींनी प्राण गमावल्याच्या, तर काही गंभीर जखमी किंवा अपंग झाल्याच्याही बातम्या आपण अधूनमधून वाचत असतो. प्राण गमावलेल्यांची वाहने त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर करण्यासाठी ‘ना हरकती’च्या जाहिराती वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असतात. याचा अर्थ अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले असतात, पण त्याचे गांभीर्य लोकांच्या नजरेस येत नाही, हे दुर्दैवी म्हणावे लागेल.
गोव्यात होणाऱ्या रस्ता अपघातांत गेल्या काही वर्षांत अनेक कुटुंबातील लोकांनी आपला आधार हरवलेला आहे. ज्यांना अपार मेहनत करून वाढविले, शिक्षण दिले ते अपघातात बळी पडून- कुटुंबावर घाला घालून- निघून गेले आहेत. गोव्यातील अपघातांची आकडेवारी पाहून माजी राज्यपालांनी गोवा ‘मर्डर स्टेट’ बनला असल्याचे संबोधले होते, त्याची आठवण येते.

हा लेख लिहीत असतानाच आणखी एका अपघाती मृत्यूची बातमी आली. पिळर्ण येथे रात्री साडेदहाच्या सुमारास मोकाट गुरांच्या धडकेमुळे एका दुचाकीस्वाराचा तोल जाऊन गेला आणि त्याने बाजूला असलेल्या नारळाच्या झाडाला जोरदार धडक दिली. त्यात तो युवक जागीच ठार झाला.
आपल्या चिमुकल्या गोव्यात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण कोणी व कसे ठेवावे हा एक प्रश्नच आहे. केवळ सरकारला जबाबदार धरून चालणार नाही, तर वाहनचालकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज आहे. शेजारील सिंधुदुर्ग किंवा कारवार, बेळगावीसुद्धा एवढे अपघात होत नाहीत. एवढेच कशाला गजबजलेल्या मुंबई महानगरीतही इतक्या मोठ्या प्रमाणात जीवघेणे अपघात होत नाहीत. गोव्यात मात्र हल्ली बरेच अपघात होत आहेत व त्यांची कारणेही बरीच आहेत.

वाहनचालकांमधील बेशिस्त हे अपघातांमधील एक प्रमुख कारण आपल्याला दिसते. अति मद्यप्राशन करून वाहने हाकणे, कुठेही म्हणजे धोकादायक वळणावरदेखील ओव्हरटेक करणे, भर रस्त्यावर वाहने उभी करून गप्पागोष्टी करणे, सिग्नल तोडणे, भरवेगाने वाहने हाकणे, शर्यत लावणे, हॅल्मेटचा वापर पोलीस नजरेस पडल्यावरच करणे, अल्पवयीनांच्या हातात वाहने देणे ही काही प्रमुख कारणे म्हणावी लागतील. चालकांनी वरील बाबतीत शिस्त पळाली तर निश्चितपणे किमान 60 ते 80 टक्के अपघात कमी होतील. हेल्मेट आपली सुरक्षा करण्यासाठी आहे असे चालकांना वाटतच नाही. पोलिसांनी ‘तालांव’ देऊ नये म्हणूनच ती वापरली जातात असे दिसते. सीट बेल्टच्या बाबतीतही तेच. तरी न्यायालयाच्या दणक्यामुळे व पोलिसांच्या कडक धोरणामुळे आता थोडी शिस्त आली आहे. रस्त्यांवरील खड्डे आणखी एक प्रमुख कारण बनले आहे. नव्याने डांबरीकरण केलेले रस्ते एकाच पावसात धुपून खड्डेमय बनतात व अपघातांना निमंत्रण देतात. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार धरावे लागेल. तसेच धोकादायक वळणे, गतिरोधक, दुचाकीसाठी प्रबंधित विभाग आदींबाबत सूचना देणारे फलक लावण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कुचराई होते. अगदी छोटे फलक लावले जातात. उदाहरण द्यायचे झाल्यास अटल सेतूचे देता येईल. या पुलावरून जाण्यास दुचाकींना बंदी आहे, पण सूचनाफलक एवढा लहान आहे की त्याकडे कोणाचे लक्षच जात नाही. पर्यटक बिनधास्तपणे पुलावरून जातात व पोलिसांकडून तालाव घेतात. गतिरोधकांवरही वेळोवेळी पट्टे मारले जात नाहीत, त्यामुळेही अपघात होतात.

अपघात टाळायचे असल्यास वाहतूक खाते, सार्वजनिक बांधकाम खाते व पोलीस यांच्यात योग्य समन्वय असणे खूप गरजेचे आहे. गृहमंत्री, वाहतूकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी नियमितपणे बैठका घेऊन योग्य नियोजन केल्यास अपघात कमी होतील. भरपाईपोटी येणारा खर्च वाचेल. त्यात सरकारचाच फायदा होईल. पूर्वी रस्ते अरुंद असताना कमी अपघात होत असत. आता रस्ते प्रशस्त झाल्यानंतर अपघातांची संख्या वाढली आहे. याचा अर्थ चालक बिनधास्तपणे, अतिवेगाने वाहने हाकत आहेत.

वाहतूक पोलीस हे तांलाव देण्यासाठीच रस्त्यावर उभे असतात. विशेषत: ते पर्यटकांना लक्ष्य बनवतात असे आरोप मंत्री व सत्तारूढ पक्षाचे आमदार करतात. ‘आरटीओ’ही वाहतूक नियोजनाकडे विशेष लक्ष देत नाही. वाहतूक पोलिसांना किती तांलाव द्यायचे व किती पैसे सरकारी तिजोरीत आणायचे हे ठरवून दिलेले असते, असे लोक उघडपणे बोलत असतात. मद्यप्राशन करून वाहने हाकणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी बारमालकांनी त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी अव्यवहार्य व हास्यास्पद सूचना वाहतूक मंत्र्यांनी केली होती.
गोव्यात वाहनसंख्या प्रचंड वाढली आहे. आज प्रत्येक घरात दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. कोविड आल्यापासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पेट्रोल, डिझेल कितीही महाग झाले तरी लोक स्वतःची वाहने वापरतात. शिवाय गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे अन्य राज्यांतील वाहने मोठ्या प्रमाणात येथे येतात. शिवाय ‘रेंट ए बाईक’ येथे उपलब्ध आहेत. मौजमजा करण्यासाठी आलेले पर्यटक यांचा वापर करतात व जवळ मद्यालयेही त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असल्याने अपघात वाढ होते. आता बारच्या बाहेर पोलिसांना उभे करण्याची कल्पना पुढे आली आहे. परंतु बारमालकांनी त्याला विरोध केला. पोलिसांनी मद्यपीची चाचणी मोहीम सुरू केली आहे, ती चालूच राहायला हवी. मद्यालये वेळेत उघडतील व वेळेत बंड होतील याकडे कडक नजर ठेवण्याची नितांत गरज आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ व गतिमान केल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. राजधानी पणजीत आरामदायी सिटी बस सेवा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव शीतपेटीत पडला आहे. पणजी मार्केट व शहराच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेले प्रकल्प पांढरे हत्ती बनले आहेत. पणजी बसस्थानकांची दुर्दशा झाली आहे. या सगळ्या गोष्टी जाग्यावर घातल्यास निश्चितपणे अपघातप्रवण राज्य ही गोव्याची प्रतिमा पुसली जाईल, अर्थात त्यासाठी जबर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.