निवडणुकांच्या मतदानासाठी ईव्हीएम यंत्राच्या वापराला विरोध करणारे एक निवेदन राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना काल गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सादर करण्यात केले, त्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करण्यात आली.
देशभरातील निवडणुकांसाठी मतदान ईव्हीएम यंत्राद्वारे न घेता मतपत्रिकेने घ्यावे, या मागणीसाठी चळवळ सुरू आहे. गोव्यात सुध्दा ईव्हीएम यंत्राच्या विरोधात चळवळ सुरू आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून एक सह्यांची मोहीम राबविण्यात आली. येथील मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन सादर करण्यासाठी येथील आझाद मैदानावर एक जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी भानू प्रताप सिंग, सावियो कुतिन्हो, रामा काणकोणकर, प्रतिमा कुतिन्हो व इतरांची उपस्थिती होती.
आझाद मैदानावर जाहीर सभेनंतर सभेला उपस्थित नागरिकांनी आल्तिनो येथील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चातील काही जणांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. सदर प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्य निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी नागरिकांचा मोर्चा अडविला. मोर्चातील पाच जणांच्या शिष्टमंडळाला येथील मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यास परवानगी देण्यात आली. या निवेदनावर सुमारे 1 लाख नागरिकांच्या सह्या आहेत.
देशातील सामान्य जनतेला ईव्हीएम या यंत्राविषयी संशय आहे. त्यामुळे ईव्हीएमद्वारे निवडणुकीसाठी मतदान घेण्याला विरोध केला जात आहे. नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतीपर्यंत पोचविण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले आहे, असे भानू प्रताप सिंग यांनी सांगितले.