गोव्यातले पत्रीपूजन

0
422
  • राजेंद्र केरकर

पत्री म्हणून वापर केल्या जाणार्‍या वृक्ष-वनस्पतींविषयीचे ज्ञान लोप पावू नये, त्यांच्या औषधी आणि उपयुक्ततेचा लाभ संतुलितरीत्या लोकमानसाने घ्यावा अशी धारणा आपल्या निसर्ग आणि पर्यावरणाविषयीचा उत्कट जिव्हाळा असणार्‍या पूर्वजांना होती. त्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या पत्रींचा उपयोग सण-उत्सवात करण्याला महत्त्व दिले.

आदिम कालखंडापासून मानवाला वृक्षवनस्पतीत असलेल्या औषधी, विषारी आणि उपयुक्त गुणधर्मांचे अनुभवाद्वारे ज्ञान लाभले होते. वृक्षवनस्पतीत अद्भुत शक्तीचा वास असतो आणि त्यानुसार त्यातल्या गुणधर्मांची उपयुक्तता फळास यावी म्हणून मानवाने जगाच्या विविध भागात वृक्षवनस्पतींना आपल्या पारंपरिक लोकधर्मात स्थान प्रदान केले. पश्‍चिम घाट आणि पश्‍चिम किनारपट्टीच्या कुशीत वसलेल्या गोव्याच्या भूमीला वृक्षवनस्पतींचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा लाभलेला असून, मौसमानुसार त्यांच्या उपलब्धतेला प्राधान्य देऊन त्यांना विविध सणउत्सवात पूजनीय स्थान दिलेले आहे. आपल्या परिसरात असलेल्या वनस्पतीतल्या औषधी आणि विषारी गुणधर्माचे ज्ञान लाभावे म्हणून आमच्या पूर्वजांनी त्यांची सांगड विविध सणउत्सव प्रसंगी होणार्‍या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याशी घातली, त्याची प्रचिती वर्षभर मौसमाच्या चक्रानुसार संपन्न होणार्‍या व्रतवैकल्ये आणि सणांतून येते.

पावसाळी मौसमातले श्रावण-भाद्रपद हे हिरवाईतल्या वैविध्यपूर्ण वारश्याचे प्रमुख महिने असून, याच कालखंडात पठारे, माळराने, जंगले विविधढंगी, विविधरंगी तृणपाती, रानफुले, वनस्पतींनी बहरतात. आपल्या सभोवताली असलेल्या हिरवाईचा रंग आणि गंध मानवी समाजाला खरं तर सनातन काळापासून विलक्षण भावलेला असल्याने, त्याने या हिरवाईच्या वैभवाचा उपयोग दैनंदिन जीवनात करण्याबरोबर सृष्टिनिर्मात्या परमेश्‍वरी शक्तिविषयीची कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग आदित्यपूजन, मंगळागौर, हरतालिकापूजन. हरगौरी पूजन, गणेश चतुर्थी यांसारख्या सण-व्रतात पूर्वापार केलेला आहे. आदित्य म्हणजे आयतार पूजनात कष्टकरी सुवासिनी तर ब्राह्मण समाजातील विवाहित पुरुष आपल्या परिसरात उपलब्ध असणार्‍या विविध तृणपाती, वनस्पती, रानफुलांचा उपयोग करतात. पोर्तुगीज आमदानीत गोव्यातल्या हिंदु धर्मियांची गळचेपी करण्यात आली. गणेश चतुर्थीला होणार्‍या मृण्मयी मूर्ती पूजेवरती बंदी घालण्यात आलेली. त्यामुळे सासष्टी, तिसवाडी, बार्देसातल्या जुन्या काबिजादीतल्या प्रदेशात एखाद्या पेटीत बंदिस्त खोलीत कागदावरती गणपतीचे चित्र रेखाटून किंवा प्रतीकात्मकरीत्या विविध वनस्पतींच्या पानांचा, फुलांचा उपयोग करून गणपतीचे पूजन पत्रीद्वारे केले जाऊ लागले. गोव्याच्या एका टोकाला असलेल्या काणकोणातल्या पैंगिणीतल्या फळगावकर कुटुंबियात गणपतीच्या मृण्मयी मूर्तिंऐवजी पत्रीद्वारे पूजन करून गणेश चतुर्थीचा सण उत्साहाने साजरा केला जातो.

गोव्यात आयतार, मंगळागौर, हरतालिका पूजनात पत्रीचा वापर करण्याची परंपरा आहे. ज्या परिसरात प्रत्येक मौसमात वनस्पती उपलब्ध असेल त्याप्रमाणे तिची पाने, फुले आदी घटकांचा पूजनात उपयोग केला जातो. सर्वसाधारणपणे कदंब, ब्राह्मी, अशोक, कण्हेर, धात्री, आघाडा, धत्तुर, मधुमालती, माका, बेल, श्‍वेतदुर्गा, बोर, शमी, रूई, डोरली, डाळिंब, ताड, अश्‍वत्थ, विष्णुकांता, मरू, देवदार, जाई, केवडा, अगस्ती, मुनीपत्र, चाफा, जपा, मल्लिका, नागचाफा, पुन्नाग, शाका, शत, पद्म, प्राजक्त, निर्गुंडी, शेवंती, कर्दली, मावळिंग, मंदार, गोकर्ण, नागवेल, सिंदुवार अशा वनस्पतींपैकी सोळा किंवा एकवीस वनस्पतींच्या पत्रींचा वापर पूजनात केला जातो.

पत्री म्हणून वापर केल्या जाणार्‍या वृक्ष-वनस्पतींविषयीचे ज्ञान लोप पावू नये, त्यांच्या औषधी आणि उपयुक्ततेचा लाभ संतुलितरीत्या लोकमानसाने घ्यावा अशी धारणा आपल्या निसर्ग आणि पर्यावरणाविषयीचा उत्कट जिव्हाळा असणार्‍या पूर्वजांना होती. त्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या पत्रींचा उपयोग सण-उत्सवात करण्याला महत्त्व दिले. केवडा, प्राजक्त, जाई-जुईसारख्या वनस्पतीच्या सुगंधी फुलांना सुवासिनींनी आपल्या रूपसज्जेसाठी उपयोग करून घेतला आणि त्याचबरोबर त्यांच्या औषधी तत्त्वांना अधोरेखित केले. पार्वती म्हणजे हिरवाईने नटलेली वसुंधरा, श्रावण-भाद्रपदात ती जणु माहेरी येते आणि त्यासाठी तिच्याविषयीची कृतज्ञता, भक्तिभाव पत्रीपूजनातून अभिव्यक्त होतो.