गोव्याच्या मावळत्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आता आपला राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण करून गोव्याचा निरोप घेत आहेत. त्यानिमित्ताने खास दैनिक नवप्रभासाठी श्री. रामनाथ पै रायकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत –
गोव्यातल्या आपला गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाकडे आपण मागे वळून कसे पाहाल?
खरे सांगायचे तर मला वाटतेय की मी गोव्यात कालच आलेले आहे. गोव्यात मी घालवलेली पाच वर्षे हा खूपच छोटा काळ वाटतो आहे. जणू काही राज्यपाल म्हणून माला येथे येऊन पाच मिनिटेच झालेली आहेत.
सर्वसाधारणपणे सत्तेच्या एखाद्या पदावर असणार्या व्यक्तीच्या दृष्टीने काळ सहज निघून जात असतो, पण माझ्या बाबतीत तसे नाही. मी खूप समाधानी आणि आनंदी आहे. आणि मला वाटते हे गोमंतकीय जनतेमुळे आणि स्थानिक प्रसारमाध्यमांनी मला दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे झाले आहे. दुसर्या कोणत्याही ठिकाणी मला एवढा स्नेह आणि सकारात्मकता मिळाली असे मला वाटत नाही. येथील लोक अतिशय सहिष्णु आहेत असे मला दिसून आले. कोणी कधी काही तक्रार घेऊन माझ्याकडे आले नाही.
राजकीय आघाडीवर देखील, खूप शांततेचा हा काळ होता. सत्ताधारी पक्ष सदस्य स्वाभाविकपणे मला भेटायचे, पण विरोधी पक्षाचे प्रतिनिधी देखील वेळोवेळी मला भेटत असत. मीही त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत करायचे आणि त्यांचे त्यांना राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटणारे विविध प्रश्न माझ्यासमोर आणायला सांगायचे. मी कधीही त्यांना भेट नाकारली नाही. खरे तर मी ह्या पदावर आहे ती त्यांचे शांतपणे ऐकून घेण्यासाठी आणि समस्यांची सोडवणूक करण्यासाठी.
मी बिहारमधील माझ्या गावाहून गोव्यात आले होते. अत्यंत प्रामाणिकपणे मला वाटते की गोवा हे गेली पाच वर्षे माझे घरच बनलेले होते!
मनोहर पर्रीकर यांच्याकडे राज्याचे नेतृत्व होते अशा काळात आपण राज्यपालपदावर होता. त्यांच्या काही आठवणी आहेत?
राजभवनातील कर्मचार्यांनी नुकताच माझ्यासाठी एक निरोप समारंभ केला. खरे तर हे सगळे कर्मचारी जणू माझ्याच कुटुंबाचे विस्तारित सदस्य आहेत. काही महिला कर्मचार्यांना तर मी चालले आहे याचे एवढे वाईट वाटले की त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्या प्रसंगी बोलताना मी काही संदर्भात पर्रीकरजींचा उल्लेख केला आणि अचानक माझा कंठ दाटून आला. मला काही काळ शब्दही उच्चारता आला नाही. काही काळ मी स्तब्धच राहिले. त्यातून सावरणे मला कठीण गेले. जेव्हा केव्हा त्यांचा उल्लेख येतो तेव्हा मला संभाषण सुरू ठेवणे कठीण बनते. कोणत्याही चर्चेच्या वेळी त्यांचे नाव येते तेव्हा मी खूप भावनाशील बनते.
पर्रीकरजींच्या विचारांमध्ये खूप स्पष्टता होती. त्यांना जर काही करायचे असेल तर ते करून टाकायचे, नाही तर नाकारायचे. मात्र, त्या नकाराचे स्पष्टीकरणही त्यांच्यापाशी असायचे. काही चर्चा करताना ते नेहमीच हसतमुख असायचे. त्यांची कार्यक्षमता आणि तीव्र स्मरणशक्ती तर सर्वज्ञात आहे.
राजभवनसाठी नवी मर्सिडीज कार विकत घ्यायचा प्रस्ताव होता तेव्हा मला आठवते की ते पेचात पडले होते. राजभवनच्या कर्मचार्यांनी जेव्हा वाहनाचा आग्रह धरला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मी कोणतीही महागडी कार मागितलेली नाही. मीही त्यांना सांगितले की मी माझ्या जीवनाचा प्रारंभ बैलगाडीत आणि टमटममध्ये म्हणजे रिक्षेत बसून केला आहे आणि मला महागड्या कारची गरज नाही. पण, मला वाटते की मी त्यांना तसे सांगायला हवे होते, कारण फार वेळ न लावता त्यांच्या सरकारने कार विकत घेतली. पण ते राजभवनच्या कर्मचार्यांना सांगायला विसरले नाहीत की जुनी मर्सिडीज विकून त्या जागी नवीन आणायची आहे, जेणेकरून
जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये. आणि त्यांनी हे सगळे त्यांच्या आजारपणाच्या काळात केले. त्या प्रक्रियेत मला खूप त्रास झाला. नव्या कारमुळे मला आनंद होण्याचा तर प्रश्नच नव्हता.
ते जे काम करायचे त्याला संपूर्ण देश साक्षी आहे. त्यांच्या आजारपणात देशभरात झालेल्या प्रार्थना पाहा. भारत ही एक अशी भूमी आहे जी चांगल्या लोकांना ओळखते आणि त्यांचे कौतुक करते. तुम्ही छोटेसे चांगले काम केलेत तरी येथे खूप कौतुक होते. पर्रीकरजींनी तर राज्यासाठी आणि देशासाठी एवढे काम केलेले आहे. इतरांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे.
आज गोव्याची धुरा डॉ. प्रमोद सावंत यांच्यासारख्या एका तरुण, उत्साही मुख्यमंत्र्यापाशी आहे. या नव्या पिढीच्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीकडे आपण कसे पाहता?
दोन मुलांना जन्म देणारी आईही दावा करू शकत नाही की तिने एकसारख्या मुलांना जन्म दिलेला आहे. त्यांच्यात काही ना काही फरक असतोच. तो निसर्गाचा नियम आहे. मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी होते आणि आनुवंशिकता आणि पर्यावरण यातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडते असे आम्हाला शिकवले गेले होते. गोव्याचे दोन सुपुत्र साहजिकच दोन वेगळ्या प्रकारचे आहेत. पण कुठेेतरी खोलवर त्यांच्यात असे काही साम्य असेल की ज्यामुळे ते एकाच कुटुंबातील, एकाच आईचे पुत्र वाटावेत. येथे हे दोघेही संघपरिवारातील आहेत, त्याच भारतीय जनता पक्षाचे आहेत. दोघांमध्ये मला आढळलेले साम्य म्हणजे दोघांतली काम करण्याविषयीची आवड. निर्णय पुढे ढकलणे दोघांना आवडायचे नाही आणि दोघेही त्वरित निर्णय घेणारे. मी नव्या मुख्यमंत्र्यांना म्हटले देखील की त्यांच्यावर पर्रीकरजींचा आणि त्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव आहे. वय आणि अनुभव हे घटक तर आहेतच, परंतु प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न दिसतो आहे.
सावंतजींना नुकताच म्हादईच्या विषयाचा सामना करावा लागला. मी त्यांना केंद्र सरकारशी बोलण्याचा, केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. तुम्ही तुमची समस्या सांगा, ते नक्कीच पर्यावरण मंजुरी मागे घेतील असे मी त्यांना सांगितले. गोव्याच्या भल्यासाठी काम करण्याची मानसिकता त्यांच्यापाशी आहे आणि त्यांची हीच मानसिकता त्यांना पुढे नेईल.
गेल्या पाच वर्षांत गोव्यात चांगले वाईट काय बदल आपल्याला जाणवले?
तुम्हाला जर वर वर दिसणार्या बदलांबाबत उत्तर अपेक्षित असेल तर निश्चितच गेल्या पाच वर्षांत साधनसुविधा, विकास आदी गोष्टी घडल्या आहेत. देशभरात सर्वत्र घडते आहे तसे ते येथेही घडते आहे आणि घडणार आहे.
तुम्हाला जर मानसिकतेविषयी आणि लोकांच्या स्वभावाविषयी म्हणायचे असेल तर मला वाटते की ह्या दोन गोष्टी बदललेल्या नाहीत. मी जेव्हा येथे आले तेव्हा मला जाणवले की गोमंतकीयांची मानसिकता आणि स्वभाव दोन्हीही कौतुकास्पद आहे. त्यात आणखी किती चांगला बदल होणार?
केंद्र सरकारला दरमहा मी अहवाल पाठवायचे, त्यात वस्तुस्थितीचा लेखाजोखा मांडायचे. मी ठामपणे सांगू शकते की राज्यातील गुन्हेगारीत घट झालेली आहे.
फक्त मला एकाच गोष्टीची खंत आहे ती म्हणजे स्वच्छ भारत अभियानात मी गोव्याला देशात सर्वोच्च स्थानी नेऊ शकले नाही. यासंदर्भातील माझी चूक मी मान्य करते. मी या अभियानांतर्गत ४० जणांचा गट स्थापन केला होता आणि त्यांना वेगवेगळी कामे नेमून दिली होती, पण हे काम केवळ जागृतीपुरतेच मर्यादित राहिले. पर्रीकरजी दक्षिण गोव्यात दुसरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणार होते, जो अजूनही होऊ शकलेला नाही. राजभवनात येणारे सर्व पाहुणे मला सांगायचे की देशाच्या इतर भागांपेक्षा गोवा खूप स्वच्छ आहे. त्यांना मी ते सांगावे लागत नव्हते.
आपण गोवा विद्यापीठाच्या कुलपतीही होता. गोवा विद्यापीठाच्या कामाविषयी आपला काय अनुभव आहे?
गोवा विद्यापीठाचे कामकाज मी जवळून पाहिले. विद्यापीठाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करायला हवे. इतर विद्यापीठांप्रमाणेच गोवा विद्यापीठालाही प्रति ष्ठा आहे. या देशाच्या दोन राष्ट्रपतींनी या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला उपस्थिती लावली होती हे उल्लेखनीय आहे. यातून या विद्यापीठाला चांगली ओळख लाभली. कार्यक्षमतेच्या बाबतीत म्हणाल तर विद्यापीठ चांगले काम करते आहे. कुलपती या नात्याने मी केलेल्या अनेक सूचना प्रत्यक्षात आणल्या गेल्या. गोवा विद्यापीठ फक्त २५ वर्षे जुने आहे आणि ते शिक्षणाचे एक चांगले केंद्र बनू शकते. खास करून त्याचा शिक्षकवर्ग चांगला आहे. काही अध्यापकांची कमतरता जरूर आहे, परंतु लवकरच ती भरली जाईल असा मला विश्वास आहे.
माघारी परतल्यावर आपल्या काय योजना आहेत? कुटुंबासमवेत वेळ घालवणे, पुस्तके लिहिणे वगैरे?
हो. काही योजना आहेत. मी ८५ पुस्तके लिहिली आहेत आणि आणखी पाच प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. मी मुख्यत्वे सामाजिक प्रश्नांवर काम करणारी एक कार्यकर्ती आहे. मी जेव्हा केंद्रीय समाजकल्याण मंडळावर अध्यक्ष होते, तेव्हा असे अनेक प्रश्न मी धसास लावले आहेत. असे अनेक प्रश्न मला आता हाती घ्यायचे आहेत. त्यातला एक विषय म्हणजे मुलींचा. प्रत्येक मुलगी ही खास आहे आणि महिलांच्या सन्मानाच्या आपल्या प्राचीन परंपरेचा मी प्रसार करू इच्छिते. गोव्याच्या समान नागरी कायद्याविषयीची माहितीही मी देशाला देईन. खरे तर या कायद्याला माझ्याच सूचनेवरून भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात स्थान मिळाले आहे. ‘तिहेरी तलाक’ च्या विषयातही मी सहभागी होेते.
गोमंतकीयांनी बदलू नये!
गुरू नानकदेव आपल्या शिष्यांसमवेत प्रेमाचा संदेश पसरवीत खूप प्रवास करायचे. त्यांच्या या प्रवासादरम्यान, एक गाव सोडण्यापूर्वी त्यांनी गावकर्यांना सांगितले, ‘जमे रहो.’ म्हणजे त्या गावात कायमचे राहा. काही दिवसांनी ते दुसर्या एका गावी पोहोचले, तेथे ते काही काळ राहिले. गाव सोडताना गावकर्यांना त्यांनी सांगितले, ‘बिखर जाओ.’ त्यांच्या शिष्यांना हे पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी गुरूंना त्याबाबत विचारले. त्यावर गुरू नानकदेव म्हणाले, पहिल्या गावातील काही लोकांपाशी जीवनमूल्ये आणि संस्कृतीचा अभाव होता, त्यामुळे ते लोक जगापासून दूर एकाच गावी राहाणे गरजेचे होते. पण दुसर्या गावचे लोक सद्गुणी आणि सुसंस्कृत होते, त्यामुळे त्यांनी सर्वदूर जाऊन ती मूल्ये पसरवावीत असे आपल्याला वाटले. गोव्यातल्या सर्वांनी गोव्याबाहेर जावे असे मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्यापाशी वरीलपैकी दुसर्या गावात असलेली मूल्ये नक्कीच आहेत. राज्यपाल असताना मी गोव्याबाहेरील असंख्य कार्यक्रमांना उपस्थित राहिले, जिथे मी गोव्याविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. गोमंतकीयांची पाळेमुळे सांस्कृतिक मूल्यांमध्ये घट्ट रुजलेली आहेत. गोमंतकीयांनी ते जसे आहेत तसे राहावे आणि राज्याची व देशाची सेवा करावी असेच मी म्हणेन!