गोव्याच्या राज्यपालपदी मृदुला सिन्हा यांची नियुक्ती

0
108

राज्यपालांच्या नेमणुका
गोव्याच्या राज्यपाल म्हणून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष व प्रसिद्ध हिंदी साहित्यिक मृदुला सिन्हा (७१) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल दुपारी राष्ट्रपती भवनातून वरील आदेश जारी करण्यात आला. तूर्त गोव्याच्या राज्यपालपदाचा हंगामी ताबा ओमप्रकाश कोहली यांच्याकडे होता.
केंद्रात नवे सरकार सत्तेवर येताच कॉंग्रेस सरकारने नियुक्ती केेलेल्या राज्यपालांच्या हकालपट्टीचे प्रयत्न सुरू झाले होते. गोव्याचे राज्यपाल भारतवीर वांच्छू यांचे नाव हेलिकॉप्टर घोटाळ्यातील एक साक्षीदार म्हणून पुढे आले होते. सीबीआयने त्यांची राजभवनवर काही तास चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. वांच्छू यांनी राजीनामा दिल्यानंतर ओमप्रकाश कोहली यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा तात्पुरता ताबा देण्यात आला होता. नव्या राज्यपालपदी नियुक्ती झालेल्या मृदुला सिन्हा यांचा जन्म १९४२ साली बिहारमधील मुजफ्फरनगरमधील छपरा या गावी झाला. त्यांनी केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मानसशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी पदवी संपादन केली. मुजफ्फरनगर येथील महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली. पुढे त्या साहित्यसेवेकडे वळल्या. मृदुला सिन्हा यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चरित्र ‘एक थी रानी ऐसी भी’ या नावाने लिहिले असून ‘नयी देवयानी’, ‘घरवास’, ‘ज्यो मेहंदीको रंग’, ‘सीता पुनी बोली’ या कादंबर्‍या, तर ‘बिहारकी लोककथाएँ’, ‘देखा मै छोटे लगे’, ‘ढाई बिघा जमीन हे कथासंग्रह, तसेच ‘मात्र देह नही है औरत’ हे स्त्री मुक्तीविषयक लेखन, ‘प्लेझर ऑफ डिझायर’ या इंग्रजी संपादित पुस्तकाचाही त्यांच्या साहित्यसंपदेत समावेश आहे. त्यांचे पती डॉ. रामकृपाल यांच्यासमवेत त्यांनीही राजकारणाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचे पती बिहारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीही होते.
गोव्याच्या सेवेस उत्सुक : सिन्हा
गोव्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी घेण्यास आणि तेथील जनतेची सेवा करण्यास आपण उत्सुक आहोत, असे उद्गार गोव्याच्या नवनियुक्त राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी काल काढले. प्रशासनाचा भाग बनले याचा आनंद वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
राज्य सरकारला जेथे जेथे आवश्यक असेल तेथे आपण सल्ला देऊ असे सिन्हा यांनी सांगितले. राज्यात सुशासन असावे यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. आपण आजवर अनेक सामाजिक कार्याशी संबंधित होतो. त्यामुळे पक्षाने आपल्याला ही सेवेची संधी दिल्याचे श्रीमती सिन्हा म्हणाल्या.

महाराष्ट्र व कर्नाटकच्या राज्यपालांचीही नियुक्ती

कल्याणसिंग राजस्थानचे राज्यपाल
गोव्याबरोबरच महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थानच्या राज्यपालांची नियुक्तीही राष्ट्रपतींनी केली असून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नेमण्यात आले आहे. गुजरातचे सभापती वजुभाई वाला यांना कर्नाटकच्या राज्यपालपदी नेमण्यात आले आहे, तर माजी केंद्रीय मंत्री सी. विद्यासागर राव यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमण्यात आले आहे. कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांचा कार्यकाल नुकताच संपला आहे, तर महाराष्ट्राचे राज्यपाल शंकरनारायण यांनी मिझोराममध्ये बदली होताच राजीनामा दिला आहे. मार्गारेट आल्वा यांनी राजीनामा दिल्याने राजस्थानची राज्यपालपदाची जागा रिक्त झाली होती.
कल्याणसिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तर वजुभाई हे पूर्वी मोदी यांच्या गुजरात मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्यानंतर गेल्या जानेवारीत त्यांची गुजरात विधानसभा सभापतीपदी निवड झाली होती. विद्यासागर राव हे वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. ते तेलंगणाचे आहेत.
दरम्यान, शंकरनारायण यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून मिझोरामच्या राज्यपालपदाचा ताबा तूर्त मणिपूरचे राज्यपाल विनोदकुमार दुग्गल सांभाळतील.
यापूर्वी नव्या सरकारच्या वतीने राम नाईक (उत्तर प्रदेश), केशरीनाथ त्रिपाठी (प. बंगाल), ओमप्रकाश कोहली (गुजरात), बलरामजी दास टंडन (छत्तीसगढ), पद्मनाभ बालकृष्ण आचार्य (नागालँड) आणि कप्तानसिंग सोळंकी (हरयाणा) यांची राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.