राजेंद्र आर्लेकर, फ्रान्सिस डिसोझा हेही शर्यतीत
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची केंद्रीय संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागण्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय पर्यटन व संस्कृती राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व सभापती राजेंद्र आर्लेकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या तिन्ही नेत्यांपैकी सर्वांत वर नाव आहे ते भंडारी समाजाचे नेते श्रीपाद नाईक यांचे.फ्रान्सिस डिसोझा हे ख्रिस्ती समाजाचे नेते असून ते मुख्यमंत्री व्हावे असे ख्रिस्ती समाजाला वाटत असले तरी ते मुख्यमंत्री बनण्यास स्वतः तेवढे इच्छुक नाहीत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर खरी स्पर्धा ही अनुसूचित जातीतील नेते व सभापती राजेंद्र आर्लेकर व केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्यातच.
श्रीपाद नाईक यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री बनण्यास आपण इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले होते. राज्यात भंडारी समाजातील लोकांची संख्या मोठी असून त्यामुळे या समाजाला खुश करण्यासाठी नाईक यांची मुख्यमंत्रीपदी निवड होऊ शकते. मात्र, राजेंद्र आर्लेकर हेही एक प्रभावी नेते असल्याने या पदासाठी वरील दोन्ही नेत्यांपैकी कुणाची निवड होते हे पहावे लागेल. मात्र, शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे वरील पदी कुणाची वर्णी लावतात त्यावर सगळे काही अवलंबून राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.