गोव्याच्या काजूला ‘जीआय’ मानांकन मिळाले असून, हे मानांकन गोव्यातील काजूचा दर्जा आणि वारसा जपण्यास मदत करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
काजूला जीआय टॅग मिळाल्याने गोव्यातील काजू उद्योगातील व्यावसायिकांना एक उत्तम संधी मिळणार आहे. गोव्याच्या स्वयंपूर्ण गोवा मोहिमेच्या दिशने हे आणखी एक मजबूत पाऊल आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने गोव्यातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविले होते. या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे. गोव्यातील एक जिल्हा, एक उत्पादनामध्ये (ओडीओपी) काजूचा समावेश करण्यात आलेला आहे.
जीआय मानांकनामुळे गोव्यातील काजूची प्रतिष्ठा आणि विक्री क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे काजू उद्योगाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी गोव्यातील नऊ उत्पादनांना जीआय मानांकन मिळालेला आहे. आता त्यात काजूची भर पडली आहे. या जीआय मानांकन मिळालेल्या उत्पादनांमध्ये वैशिष्टपूर्ण असलेली बेबिंका, मानकुराद आंबा, सात शिऱ्याची भेंडी, आगशीच्या वांगी, काजू फेणी, खोला मिरची, हरमल मिरची, मांडोळी केळी, गोमंतकीय खाजे यांचा समावेश आहे.