गोव्याच्या आयटी धोरणाची केंद्रीय मंत्री प्रभूंकडून प्रशंसा

0
140

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी गोवा सरकारच्या आयटी धोरणाची प्रशंसा केली आहे. गोव्यातील स्टार्ट अप उद्योजकांच्या उत्पादनाना चांगले मार्केट मिळवून दिले जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री प्रभू यांनी दिले. तसेच गोव्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांना स्वित्झर्लंड आयोजित डाव्होस शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण प्रभू यांनी दिले आहे.

सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने केंद्रीय मंत्री प्रभू यांच्या गोवा दौर्‍याचा फायदा घेऊन त्यांच्यासमोर गोव्याच्या आयटी क्षेत्राबाबत रविवारी एका कार्यक्रमात सादरीकरण केले. यावेळी खात्याचे मंत्री रोहन खंवटे, संचालक अमेय अभ्यंकर व इतर अधिकारी उपस्थिती होते.

गोवा सरकारच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या आयटी धोरणाने केंद्रीय मंत्री प्रभावीत झाले आहेत. केंद्रीय मंत्री प्रभू यांनी आयटी स्टार्टअप उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने जानेवारी २०१८ मध्ये स्वित्डर्लंड येथे आयोजित डेव्होस शिखर परिषदेत मंत्री खंवटे यांनी सहभागी व्हावे. या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री सुध्दा उपस्थित राहणार आहे. या परिषदेत गोव्यात प्रथमच सहभागी होणार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रभू यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री प्रभू यांचा गोव्याच्या आयटी क्षेत्राच्या विकासासाठी भरघोस पाठिंबा मिळत आहे. दिल्ली येथे केंद्रीय मंत्री प्रभू यांच्या भेट घेऊन आयटी विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाची इनव्हस्ट इंडिया व स्टार्टअप या दोन पथकांनी गोव्याला भेट देऊन आयटी विकासावर चर्चा व मार्गदर्शन केले आहे. नववर्षात गोव्याच्या आयटी क्षेत्राच्या विकासाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.