गोव्याचे ओडिशावर सहा गोल

0
97

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेतील काल सोमवारी झालेल्या लढतीत गोव्याने ओडिशाचा ६-१ असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याच्या आशा कायम राखल्या. अंतिम चार संघात स्थान मिळविण्यासाठी गोव्याला २८ रोजी पंजाबचा पराभव करावा लागेल तसेच मिझोरमने कर्नाटकला नमविण्यासाठी प्रार्थनादेखील करावी लागणार आहे.

मिझोरमने ‘ब’ गटातून ९ गुणांसह यापूर्वीच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित केला आहे. गोव्याकडून काल कर्णधार व्हिक्टोरिनो फर्नांडिस (१५वे ४५वे, तिसरे व ५४वे मिनिट) याने हॅट्‌ट्रिक नोंदविली. शुबर्ट परेराने ७१व्या मिनिटाला तर मार्कुस मास्कारेन्हसने ८६व्या मिनिटाला गोल केला. ओडिशाचा एकमेव गोल सुनील सरदार याने १६व्या मिनिटाला नोंदविला. दिवसातील दुसर्‍या सामन्यात पंजाबने कर्नाटकला २-१ असे हरविले. मिझोरमकडून पहिल्या सामन्यात १-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर पंजाबचा संघ काल ०-१ असा पिछाडीवर होता. सामन्याच्या सातव्याच मिनिटासा राजेशने कर्नाटकला आघाडीवर नेले होते. जीतेंदर सिंग (१८वे मिनिट) व बलतेज सिंग (२६वे मिनिट) यांनी लागोपाठ दोन गोल करत रवींद्र सरोवर मैदानावर झालेल्या या लढतीत पंजाबला विजयी केले.