गोव्याची राज्यसभेची जागा विनय तेंडुलकर यांनी जिंकली

0
155

राज्यसभेच्या गोव्यातील एकमेव जागेसाठी काल झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनय तेंडुलकर सहा मतांच्या आघाडीने विजयी झाले. तेंडुलकर यांना २२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व व राज्यसभेचे उमेदवार शांताराम नाईक यांना १६ मते मिळाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी भाजप उमेदवार तेंडुलकर यांच्या बाजूने मतदान केले. श्री. तेंडुलकर यांनी त्यांचे आभार मानले. विधानसभेच्या सर्व ३८ आमदारांनी या निवडणुकीत मतदान केले. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे मतदान दुपारी १२ वाजेपर्यंत चालले. ४० सदस्यीय गोवा विभानसभेत कॉंग्रेसपाशी १६ आमदार असून भाजपापाशी १२, मगो व गोवा फॉरवर्डपाशी प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस १ व तीन अपक्ष असे एकूण संख्याबळ आहे. वाळपई व पणजीची पोटनिवडणूक व्हायची असल्याने दोन जागा रिक्त आहेत. सरकारच्या सर्व घटक पक्षांनी व अपक्षांनी तेंडुलकर यांच्या बाजूने मतदान केले. कॉंग्रेसच्या सर्व आमदारांनीही शांताराम नाईक यांच्यासाठी मतदान केले. मात्र, चर्चिल यांच्या मतामुळे तेंडुलकर यांची आघाडी एका मताने वाढली. राष्ट्रपती निवडणुकीतही चर्चिल यांनी कोविंद यांच्या बाजूने मतदान केले होते. कॉंग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रपती निवडणुकीत भाजप उमेदवारासाठी मतदान केले होते, मात्र राज्यसभा निवडणुकीत तसे होऊ शकले नाही.
आपल्या पक्षाच्या व घटक पक्षाच्या आमदारांनी आपल्याला मतदान केल्याबद्दल तेंडुलकर यांनी त्यांचे आभार मानले. गोव्याच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी आपल्या पक्षाला व घटक पक्षांना दिले. पंचायत पातळीपासून राज्यसभेपर्यंत आता भाजपचे प्रतिनिधित्व गोव्यात असून एक वर्तुळ पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.