चंदीगडविरुद्ध रविवारपासून सुरू झालेल्या रणजी करंडक प्लेट विभागातील महत्त्वाच्या सामन्यात गोव्याने चंदीगड विरुद्ध पहिल्या दिवशी सर्वबाद २५१ धावांपर्यंत मजल मारली. दिवसअखेर चंदीगडने बिनबाद ३ धावा केल्या आहेत.
चंदीगडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर गोव्याची आघाडी फळी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. तेराव्या षटकाअखेर गोवा संघाची ६ बाद २६ अशी दयनीय स्थिती झाली होती. सुयश प्रभुदेसाई (९०) व दर्शन मिसाळ (५४) यांनी सातव्या गड्यासाठी १३३ धावांची भागीदारी करत गोव्याचा डाव सावरला. फेलिक्स आलेमाव (२५) व विजेश प्रभुदेसाई (नाबाद ४०) यांनी ६५ धावा जोडत गोवा संघाला अडीचशेच्या पुढे नेले. चंदीगडकडून जगजीत सिंग याने ६४ धावांत सर्वाधिक ५ गडी बाद केले. निर्मोहीने ३ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक ः गोवा पहिला डाव ८०.३ षटकांत सर्वबाद २५१ ः सुमीरन ०, कौशिक ४, पटेल ३, अमित २, कवठणकर ०, पांड्रेकर ८, सुयश ९०, मिसाळ ५४, गर्ग ७, आलेमाव २५, विजेश नाबाद ४०, निर्मोही ३८-३, जगजीत ६४-५, जसकरन ३८-१) वि. चंदीगड २ षटकांत बिनबाद ३ (शिवम भांब्री नाबाद ३, अर्सलान खान नाबाद ०)