गोव्याची अरुणाचल प्रदेशवर डाव व ३३६ धावांनी मात

0
140

गोव्याने अरुणाचल प्रदेशला दुसर्‍या डावातही १७० धावांवर गारद करीत पर्वरी येथील गोवा क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या प्लेट गट लढतीत काल तिसर्‍याच दिवशी डव व ३३६ धावांनी विजय मिळविला. या लढतीत मिळविलेल्या बोनस गुणांमुळे ७ सामन्यांतून ५ विजय व २ बरोबरींसह गोवा प्लेट गटात अव्वल स्थानी असून त्यांना एलिट गटात प्रवेश करण्याची चांगली संधी आहे. ६ सामने खेळलेला पद्दुचेरी संघ ३३ गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे.

दुसर्‍या दिवसाच्या ३ बाद १९ धावांवरून पुढे खेळताना गोव्याचा कर्णधार अमित शर्माच्या जादुई फिरकीमुळे अरुणाचल प्रदेशचा दुसरा डाव १७० धावांवर सुंपष्टात आला. त्यांच्या राहुल दलालने एकाकी झुंज देताना ६८ धावांची अर्धशतकी खेळी केली. अखिलेश सहानीने २८, शाश्‍वत कोहलीने १९ तर ताकम तल्लमने १८ धावांचे योगदान दिले. अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. गोव्याकडून कर्णधार अमित वर्माने ७१ धावांत ६ गडी बाद करीत सामनावीर पुरस्कारही पटकाविला. दर्शन मिसाळने २ तर अमुल्य पांड्रेकर व फेलिक्स आलेमाव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः गोवा, पहिला डाव ः २ बाद ५२९ घोषित (सुमिरन आमोणकर १६०, वैभव गोवेकर १६०, स्मित पटेल नाबाद १३७, अमित वर्मा नाबाद १२२), अरुणाचल प्रदेश, पहिला डाव ः सर्वबाद ८३ (कामशा यांगफो २२, राहुल दलाल १६, ताकम तल्लम १४ धावा. दर्शन मिसाळ ४-२४, अमित वर्मा ३-२, अमुल्य पांड्रेकर २-१९, विजेश प्रभुदेसाई १-१५), अरुणाचल प्रदेश, दुसरा डाव ः सर्वबाद १७०, (राहुल दलाल ६८, अखिलेश सहानी २८, शाश्‍वत कोहली १९, ताकम तल्लम १८ धावा. अमित वर्मा ६-७१, दर्शन मिसाळ २-२५, अमुल्य पांड्रेकर १-२१, फेलिक्स आलेमाव १-३१ बळी).