पुदुचेरी येथे सुरू असलेल्या विनू मांकड १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गोव्याने काल गुरुवारी सिक्कीमचा ९० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सिक्कीमने गोव्याचा ४५.१ षटकांत केवळ १५६ धावांत खुर्दा उडविला. परंतु, गोव्याने विजयासाठी ठेवलेले १५७ धावांचे किरकोळ आव्हान सिक्कीमला पेलविले नाही. त्यांचा डाव २४.१ षटकांत अवघ्या ६६ धावांत संपला. गोवा संघाकडून अष्टपैलू मोहित रेडकर याने सर्वाधिक ३९ धावा केल्या.
गोव्याच्या आयुष वेर्लेकरने २० तर गौरेश कांबळी व कौशल हट्टंगडी यांनी प्रत्येकी १८ धावांचे योगदान दिले. सिक्कीमच्या इंगशो लिंबू व भिम यांनी प्रत्येकी ३ तर संकल्प याने २ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना सिक्कीमकडून अन्वेष (१५) याने सर्वाधिक धावा केल्या. साजल थापाने १२ धावा केल्या. गोव्याकडून ऋत्विक नाईक याने २२ धावा देत ४ बळी घेतले. हर्ष जेठाजी याने ३, शादाब खानने २ तर शुभम तारी याने १ बळी घेतला.
गोव्याने आपल्या पहिल्या सामन्यात मेघालयचा १८४ धावांनी पराभव केला होता. तर दुसर्या लढतीत अरुणाचलवर १४७ धावांनी मात केली होती. कालच्या विजयासह गोव्याने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. गोव्याचा पुढील सामना ११ रोजी उत्तराखंड संघाशी होणार आहे.