गोव्याचा मुक्तीलढा लवकरच भव्य चंदेरी पडद्यावर साकारणार असून एका फ्रेंच दिग्दर्शकाने हे आव्हान पेलण्याचे ठरवले आहे. भारतीय लष्कराला शरण गेलेल्या पोर्तुगीज सैनिकांची मानसिक अवस्था हे या चित्रपटाचे केंद्र असणार आहे. ‘दा गोवा’नावाचा हा चित्रपट असून त्यात पोर्तुगीज राजवटीच्या अंतिम पर्वकाळाचे चित्रण असेल. जेम्स मातेऊस टिके हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.जुआंव हा या चित्रपटाचा नायक असून तो पोर्तुगीज सैनिक असतो. मात्र, भारतीय लष्कराच्या कारवाईत गोवा मुक्त होतो तेव्हा तो भारतीय सैन्याच्या तावडीत सापडतो. त्याने भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली म्हणून त्याला गद्दार मानले जाते. त्याच्या व्यथा या चित्रपटात मांडल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे गोवा मुक्तीच्या काळात दिग्दर्शक टिके यांचे वडील गोव्यात आले होते आणि त्यांनी प्रत्यक्ष मुक्तीचे क्षण अनुभवले होते.
या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात होणार असून त्यासाठी स्थानिक अभिनेते, दिग्दर्शक यांचा शोध घेण्यात येत आहे. दोन कोटी डॉलर खर्चाच्या या चित्रपटाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.