>> विजय हजारे करंडक क्रिकेट
>> आदित्य कौशिकचे शतक, दर्शन मिसाळचे चार बळी
आदित्य कौशिकच्या शतकानंतर दर्शन मिसाळने घेतलेल्या चार बळींच्या जोरावर काल विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील लढतीत झारखंडचा ४२ धावांनी पराभव करत पूर्ण ४ गुणांची कमाई केली. या स्पर्धेतील सामने बंगळुरू येथे खेळविण्यात येत आहेत.
गोव्याने विजयासाठी ठेवलेल्या २६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झारखंडचा डाव २२४ धावांत संपला.
झारखंडचा कर्णधार ईशान किशन याने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर गोव्याची सुरुवात अपेक्षित झाली नाही. माजी कर्णधार सगुण कामत सलग दुसर्या सामन्यात अपयशी ठरला तर तर स्थिरावत असताना अमोघ देसाई बाद झाला. गोव्याचे अर्धशतक १७.२ षटकांत फलकावर लागले. स्नेहल कवठणकरने कुर्मगती फलंदाजी करत संघावरील दबाव वाढवला. केवळ १९ धावांसाठी त्याने ४५ चेंडू खर्च केले. ‘पाहुणा’ खेळाडू आदित्य कौशिक याने मात्र झारखंडच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. चौफेर फटकेबाजी करताना त्याने १२ चौकार व ३ षटकारांसह ११७ धावा चोपल्या. पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेला अमित वर्मा केवळ १२ धावांचे योगदान देऊ शकला. यष्टिरक्षक फलंदाज गौतमने ४० धावांची उपयुक्त खेळी केली. झारखंडकडून राहुल शुक्लाने ३३ धावांत ६ बळी घेतले.
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना हेरंब व लक्षय यांनी झारखंडला सुरुवातीलाच धक्के देताना त्यांची २ बाद १४ अशी स्थिती केली. देवव्रत व तिवारी यांच्यात तिसर्या गड्यासाठ ४५ धावांची भागीदारी झाली ईशान किशन व विराट सिंग यांनी पाचव्या गड्यासाठी ७७ धावांची भागीदारी रचत संघाला विजयाच्या दिशेने नेले. परंतु, दर्शनने एकाच षटकांत या दोघांना माघारी धाडत झारखंडची ६ बाद १४६ अशी स्थिती केली. यानंतर वाढती आवश्यक धावगती व शिल्लक गडी यांचा समतोल राखण्यात झारखंडचा संघ कमी पडला.
धावफलक
गोवा ः सगुण कामत झे. देवव्रत गो. शुक्ला ८, अमोघ देसाई झे. ईशान किशन गो. शुक्ला १७, स्नेहल कवठणकर झे. कुमार सिंग गो. आनंद सिंग १९, आदित्य कौशिक झे. कुमार सिंग गो. शुक्ला ११७ (११० चेंडू, १२ चौकार, ३ षटकार), अमित वर्मा झे. ईशान किशन गो. शुक्ला १२, सीएम गौतम पायचीत गो. नदीम ४०, सुयश प्रभुदेसाई झे. ऍरोन गो. शुक्ला १८, दर्शन मिसाळ झे. ईशान किशन गो. शुक्ला ५, हेरंब परब नाबाद १, लक्षय गर्ग नाबाद ९, अवांतर २०, एकूण ५० षटकांत ८ बाद २६६
गोलंदाजी ः वरुण ऍरोन ९-०-४८-०, कुमार सिंग १०-१-७१-०, राहुल शुक्ला १०-१-३३-६, शहाबाज नदीम ९-०-३५-१, आनंद सिंग ७-०-४७-१, अनुकूल रॉय ५-१-२९-०
झारखंड ः आनंद सिंग पायचीत गो. परब ८, इशांक जग्गी त्रि. गो. गर्ग ३, कुमार देवव्रत झे. व गो. सुयश २०, सौरभ तिवारी झे. अमोघ देसाई गो. सुयश २६, ईशान किशन त्रि. गो. मिसाळ ४३, विराट सिंग झे. गर्ग गो. मिसाळ ३२, अनुकूल रॉय झे. अमोघ देसाई गो. गर्ग ४०, शहाबाज नदीम झे. बदली पांड्रेकर गो. मिसाळ ४, वरुण ऍरोन त्रि. गो. परब १७, राहुल शुक्ला नाबाद ८, कुमार सिंग पायचीत गो. मिसाळ ०, अवांतर २३, एकूण ४८.१ षटकांत सर्वबाद २२४
गोलंदाजी ः लक्षय गर्ग ९-०-५६-२, हेरंब परब १०-०-४३-२, शुभम देसाई १०-०-४४-०, सुयश प्रभुदेसाई १०-१-३३-२, अमित वर्मा २-०-६-०, दर्शन मिसाळ ७.१-१-३५-४
गोवा संघात तीन बदल
आंध्र प्रदेशविरुद्धच्या लढतीत खेळलेल्या वैभव गोवेकर (०), अमूल्य पांड्रेकर (११-०) व दीपराज गावकर (१२) यांना वगळून झारखंडविरुद्धच्या लढतीसाठी स्नेहल कवठणकर, सुयश प्रभुदेसाई व शुभम देसाई (‘अ’ दर्जा पदार्पण) यांना संधी देण्यात आली.