पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार; फातोर्डा स्टेडियमवर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
देशातील खेळाचा महाकुंभ गोव्यात पोहोचला आहे. गोव्यातील संपूर्ण वातावरण क्रीडामय बनले आहे. गोव्यात फुटबॉल खेळ प्रसिद्ध आहे. तसेच, इतर क्रीडा प्रकारांत सुध्दा गोवा राज्य आघाडीवर आहे. या गोमंतभूमीने देशाला उत्कृष्ट फुटबॉलपटू दिले, त्यांनी देशाला नावलौकिक मिळवून दिला. भारतातील अनेक राज्यांनी क्रीडा रत्ने दिली आहेत, तशीच गोव्यानेही देशाला अनेक क्रीडा रत्ने दिली आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल काढले. आजच्या घडीला गोव्यात क्रीडा प्रतिभेची कमतरता नाही. गोव्यातील या क्रीडा प्रतिभेचा देशाला मोठा फायदा होऊ शकतो. गोव्यात खेळांसाठी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा युवा क्रीडापटूंनी योग्य वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे गोव्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
काल फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा भव्यदिव्य आणि दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. संगीत आणि नृत्याची मेजवानी, मल्लखांब व योगासनांची चित्ताकर्षक प्रात्यक्षिके यामुळे हा सारा सोहळा चांगलाच रंगला. गोव्याची महिला विंडसर्फर कात्या कुएल्हो आणि राष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने पंतप्रधान मोदींकडे क्रीडा स्पर्धेची मशाल सुपूर्द केली.
केंद्र सरकारचे क्रीडा विकासाला प्राधान्य
युवा वर्गातील क्रीडा प्रतिभा ओळखून त्यांना योग्य वळण देण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळात क्रीडा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिल्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने मोठे यश मिळविले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ऑलिम्पिकच्या साधनसुविधांसाठी
100 लाख कोटी रुपयांचा खर्च
देशात ऑलिम्पिकच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. या स्पर्धेसाठी साधनसुविधांसाठी सुमारे 100 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. भारताची क्रीडा क्षेत्रात विकासाची वाटचाल कायम ठेवली जाणार आहे, असे मोदी म्हणाले.
… म्हणून आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पदके
आजच्या युवा पिढीला ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून योग्य क्रीडा प्रशिक्षण दिले जात आहे. देशाची गेल्या 70 वर्षांतील क्रीडा क्षेत्रातील कामगिरी सुमार दर्जाची होती. आपल्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पेक्षा जास्त पटके पटकाविणे शक्य झाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही देशातील युवा वर्गाच्या क्रीडा प्रतिभेला चालना देण्यासाठी पूरक आहे. या राष्ट्रीय स्पर्धेतील विविध भागातील युवा क्रीडापटूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते, असेही पंतप्रधान म्हणाले.
अर्थसहाय्य, प्रशिक्षणाची सोय
केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्राच्या विकासावर भर देण्यास प्रारंभ केला. खेळासाठी योग्य साधन सुविधा उपलब्ध करण्याबरोबर क्रीडापटूंना आर्थिक साहाय्य, प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती
या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे, गोव्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा, खासदार फ्रान्सिस सार्दिन, खासदार सदानंद शेट तानावडे व इतरांची उपस्थिती होती.
प्रतिभावंत क्रीडापटूंना 6 लाखांची शिष्यवृत्ती
क्रीडा क्षेत्राच्या निधीमध्ये तीन पट वाढ करण्यात आली आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून योग्य वातावरण निर्मिती केली जात आहे. युवा क्रीडापटूंना खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच प्रतिभावंत क्रीडापटूंना सहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती सुध्दा दिली जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून अनेक क्रीडापटूंना खास प्रशिक्षण देण्यात आले, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
31 ऑक्टोबरला ‘माझा भारत’ अभियान
येत्या 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीदिनी ‘माझा भारत’ अभियान सुरू करण्यात येणार आहे. या दिवशी एकता दौडचे आयोजन केले जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
परिषदा, संमेलन आयोजनासाठी गोवा मुख्य ठिकाण
गोवा राज्य आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलनांच्या आयोजनाचे देशातील मुख्य ठिकाण बनले आहे. गोवा ही उत्सव भूमी म्हणून ओळखली जात आहे. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे. जी-20 च्या आठ बैठकांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
ऑलिम्पिक आयोजनाची भारताची पूर्ण तयारी
भारत देशाची वर्ष 2030 मध्ये युवा ऑलिम्पिक आणि वर्ष 2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची तयारी असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघटनेला कळविले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी प्रयत्न : मुख्यमंत्री
गोवा हे जागतिक पातळीवर आज क्रीडा डेस्टिनेशन बनले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धा गोव्यात होत आहेत. गोव्यातील युवक विविध क्रीडा प्रकारात चमक दाखवत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यावर भर दिला जाणार आहे. क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 43 खेळाचे आयोजन केले जात आहे. गोव्यातील खेळाडू या स्पर्धेत आपली चमक दाखवतील, असे विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
वर्षभरात देशात 1 हजार खेलो इंडिया केंद्रे : ठाकूर
देशभरात एका वर्षात 1 हजार खेलो इंडिया केंद्रे सुरू केली जाणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी याप्रसंगी केली. देशात युवा वर्गातील क्रीडा गुणांना चालना देण्याचे काम खेलो इंडिया केंद्रातून केले जाणार आहे. खेलो इंडियाच्या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या होतकरू खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले आहे, असेही मंत्री ठाकूर यांनी नमूद केले.
उद्घाटन सोहळ्याची क्षणचित्रे
दुपारी तीन वाजल्यापासून 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या फातोर्डा स्टेडियमबाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दीड-दोन तास त्यांना उन्हात रांगेत राहावे लागले, तरीही त्यांच्यात उत्साह दिसून येत होता.
स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था होती. पूर्ण तपासणी करून नंतरच लोकांना आत सोडले जात होते.
उदघाटन सोहळा सुरू होण्यापूर्वी हवेत तरंगणाऱ्या भल्यामोठ्या फुग्यावर एका युवतीने थरारक प्रात्यक्षिके करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सायंकाळी 4.20 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्टेडियमवर आगमन.
मैदानातील एका मंचावर सायंकाळी 4.30 पासून विविध नृत्याचे कार्यक्रम चालू झाले. त्यात पाश्चात्ये नृत्य आणि गोमंतकीय कुणबी नृत्याचा समावेश होता.
गोमंतकीय पार्श्वगायिका हेमा सरदेसाई यांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न.
पंतप्रधानांच्या आगमनापूर्वीच क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचे भाषण.
पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांच्या गायनाचा कार्यक्रम चालू असतानाच बगळयांचा एक थवा स्टेडियममध्ये शिरला व दोन फेरे मारून तो स्टेडियम बाहेर गेला. ह्या अनाहुत पाहुण्यांना पाहून प्रेक्षकांमध्ये जोश भरला.
सुखविंदर सिंग यांनी चक दे डंडिया हे गाणे सादर केले असता प्रेक्षकांनी अक्षरशः जल्लोष केला. यावेळी लेझर शोमुळे जल्लोषाला अधिकच उधाण आले.
पंतप्रधानांचे आगमन होईपर्यंत अडीच तास सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायंकाळी 6.45 वाजता फातोर्डा स्टेडियममध्ये आगमन.
पंतप्रधानांचे आगमन होताच त्यांचे गोव्याच्या पारंपरिक घोडेमोडणीने स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांच्यासह पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वयंपूर्ण फेरी’ रथातून संपूर्ण स्टेडियमला फेरी मारत हात उंचावून लोकांना अभिवादन केले.
37 ढोलवादकांनी पंतप्रधानांना यावेळी गोव्याच्या पारंपरिक तालात सलामी दिली.
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मल्लखांब व योगासनांची चित्ताकर्षक प्रात्यक्षिके यावेळी सादर केली.
भारतीय क्रीडापटू हरमनप्रीत सिंग व कात्या कुएलो यांनी क्रीडाज्योत पंतप्रधान मोदी यांच्या हाती सुपूर्द केली.
मोदींच्या आगमनानंतर भारताची एकेकाळची आघाडीची धावपटू पी. टी. उषा यांचे भाषण झाले.
पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री डॉ. सावंत आदींच्या भाषणांचा भर आपल्या सरकारच्या कामगिरीवर दिसून आला.
ध्वनिक्षेपक यंत्रणा चांगली नसल्याने उद्घाटन सोहळ्यात भाषण करणारे नेते काय बोलत आहेत, ते कुणालाही ऐकू येत नव्हते. त्यामुळे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची प्रचंड गैरसोय झाली.