गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू

0
11

मुख्यमंत्र्यांकडील आदिवासी कल्याण खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे भोवले; आता मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?

मंत्री गोविंद गावडे यांना काल अखेर राज्य मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिफारशीनंतर राज्यपालांनी त्याविषयीचा आदेश जारी केला. गोविंद गावडे हे कला-संस्कृती, क्रीडा, ग्रामीण विकास या तीन खात्यांचा कार्यभार सांभाळत होते. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील आदिवासी कल्याण खात्यावर केलेला भ्रष्टाचाराचा आरोप मंत्री गावडे यांना भोवल्याची चर्चा आहे. तसेच कला अकादमी नूतनीकरणाच्या विषयावरूनही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या घडामोडीनंतर सत्ताधारी गटातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. गावडे यांना मंत्रिमंडळातून हटवल्याने एक जागा रिक्त झाली असून, त्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदिवासी कल्याण खात्याने गत महिन्यात 25 मे रोजी फोंडा येथे आयोजित केलेल्या प्रेरणा दिन कार्यक्रमात मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या आरोपांमुळे भाजपमध्ये खळबळ माजली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या आरोपांची गंभीर दखल घेऊन योग्य वेळी कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गोविंद गावडे यांच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर मंत्री गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्यावर गंभीर स्वरूपाच्या आरोपांचे प्रकरण भाजपच्या केंद्रीय नेत्यापर्यंत पोचविण्यात आले होते. त्यानंतर गावडे यांच्यावर कारवाईसाठी केंद्रीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना परवानगी दिली होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री गोविंद गावडे यांना राज्य मंत्रिमंडळातून वगळण्याची शिफारस राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे केली होती. या शिफारशीनंतर मंत्री गोविंद गावडे यांना वगळण्याचा आदेश काल राज्यपालांनी जारी केला.

मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा आदेश सर्वसाधारण प्रशासन विभागाने काल जारी केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री गोविंद गावडे यांना डच्चू देण्याची शिफारस राज्यपालांनी स्वीकारल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला.
आता मंत्रिमंडळात कुणाला संधी?
मंत्री गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर कुणाला संधी दिली जाईल याबाबत तूर्त कोणतीही स्पष्टता नाही. राज्य मंत्रिमंडळाची पूर्ण फेररचना होण्याची चर्चा सुरू आहे. आणखी दोन मंत्र्यांना हटविले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत
मंत्री गोविंद गावडे मंत्रिपदाच्या काळात आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक वेळा अडचणीत सापडले होते. तथापि, त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात आली नव्हती. मंत्री गावडे यांचे आदिवासी कल्याण खात्याच्या संचालकांशी दूरध्वनीवरून झालेला स्फोटक संवाद वादग्रस्त बनला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या वादग्रस्त संवादावर पडदा टाकला होता.

गोविंद गावडे यांची राजकीय कारकीर्द
गोवा विधानसभेच्या 2017 च्या निवडणुकीत गोविंद गावडे हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी आदिवासी कल्याण, कला व संस्कृती आणि नागरी पुरवठा खात्याचा कारभार देण्यात आला होता.

त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पहिल्या कार्यकाळातही मंत्रिमंडळात गोविंद गावडे यांचा समावेश होता.
वर्ष 2022 च्या निवडणुकीपूर्वी गोविंद गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात गोविंद गावडे यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे कला व संस्कृती, क्रीडा, ग्रामीण विकास ही खाती देण्यात आली होती.

वगळण्याचा निर्णय एकमताने : दामू नाईक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय नेतृत्व आणि पक्षसंघटनेच्या एकमताने मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आगामी दिवसांत अनेक निर्णय घेतले जाणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल सांगितले.

क्रांती दिनी मला बक्षीस : गोविंद गावडे
गोवा क्रांती दिनी मला हे बक्षीस मिळाले आहे; कारण मी आदिवासी समुदायांसाठी उभे राहिलो. मी ज्या संघर्षासाठी आवाज उठवला होता, तो सुरू ठेवण्यासाठी मला मुक्त केल्याबद्दल माझ्या सरकारचे आणि पक्षाचे आभार, अशी प्रतिक्रिया गोविंद गावडे यांनी काल मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर दिली.