डिसेंबर 2024 पर्यंत गोवा हे 100 टक्के साक्षर राज्य ठरवण्याचे लक्ष्य गोवा सरकारने ठेवलेले असून, त्यासाठीची साक्षरता मोहीम 2023 साली म्हणजेच गेल्या वर्षी सरकारने हाती घेतली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी भारतात नवी साक्षरता मोहीम हाती घेतल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने डिसेंबर 2024 पर्यंत गोवा हे 100 टक्के साक्षरांचे राज्य ठरवण्याचे लक्ष्य ठेवले होते. 15 वर्षे व त्यावरील निरक्षरांना साक्षर बनवणे अशी ही केंद्र सरकारची मोहीम आहे.
या मोहिमेखाली निरक्षर लोकांचा शोध घेणे व नंतर त्यांना साक्षर बनवण्यासाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे असा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाखाली गोवा सरकारने राज्यातील शैक्षणिक संस्थांना मदतीने 3 हजार निरक्षर शोधून काढले होते. त्यापैकी 729 जणांना साक्षरतेचे धडे देऊन त्याची परीक्षा घेण्यात आल्यानंतर त्यांना साक्षर घोषित करण्यात आले, तर अन्य 1289 जणांच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सध्या ह्या साक्षरता मोहिमेचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. या साक्षरता मोहिमेसाठी पंचायत संचालनालय, समाजकल्याण संचालनालय, नियोजन आणि सांख्यिकी संचालनालय यांची मदत घेण्यात आलेली आहे.
काही स्थानिक संस्थांनीही 1001 निरक्षर लोकांचा शोध घेऊन त्यांनाही साक्षर बनवण्यासाठीचे प्रशिक्षण वर्ग घेतले जावेत, अशी सूचना केल्यानंतर ते कामही हाती घेण्यात आले आहे. या योजनेखाली कुणालाही साक्षर होण्यासाठी सक्ती करता येत नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.