गोवा 100 टक्के साक्षरतेची उद्या घटकराज्यदिनी घोषणा

0
8

>> केंद्रीय शिक्षण मंत्रालय करणार घोषणा; देशातील दुसरे 100 टक्के साक्षर राज्य

गोवा घटकराज्यदिनी म्हणजेच उद्या (दि. 30 मे) गोवा हे 100 टक्के साक्षरता असलेले राज्य घोषित केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना काल दिली. केंद्रीय शिक्षण मंत्रालय 30 मे रोजी गोवा हे 100 टक्के साक्षरता असलेले राज्य बनले असल्याची घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ण केलेले गोवा हे आता देशातील दुसरे राज्य ठरणार आहे. 20 मेपूर्वी जर गोव्याने 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ण केले असते, तर सदर उद्दिष्ट पूर्ण करणारे ते देशातील पहिले राज्य ठरले असते. अवघ्या 12 दिवसांनी मागे पडल्याने वरील उद्दिष्ट पूर्ण करणारे गोवा हे आता देशातील दुसरे राज्य ठरले आहे. 100 टक्के साक्षरतेच्या बाबतीत मिझोरमने एक पाऊल पुढे टाकत गोव्याला मागे टाकले आहे.
गोवा सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यापर्यंत गोवा हे 100 टक्के साक्षरता असलेले राज्य हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, ते लक्ष्य गाठणे राज्याला शक्य झाले नव्हते.

2023-24 यावर्षी साक्षरतेच्या बाबतीत मिझोरम हे राज्य सर्वांत आघाडीवर होते. त्यांची साक्षरतेची टक्केवारी ही 98.2 टक्के एवढी होती, तर गोवा हे 93.6 टक्के साक्षरतेसह आठव्या स्थानी होते. 97.3 टक्क्यांसह लक्ष्यदीप हे दुसऱ्या स्थानी, 95.7 टक्क्यांसह नागालँड हे तिसऱ्या स्थानी, 95.3 टक्क्यांसह केरळ हे चौथ्या, 94.2 टक्क्यांसह मेघालय हे पाचव्या, 93.7 टक्क्यांसह त्रिपुरा व चंदीगढ सहाव्या, आठव्या स्थानी गोवा, 92.7 टक्क्यांसह पाँडिचेरी नवव्या, तर 92 टक्क्यांसह मणिपूर हे सातव्या स्थानी होते.आठव्या स्थानी असलेल्या गोव्याने साक्षरतेच्या बाबतीत भरारी घेत 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट गाठत हे उद्दिष्ट गाठणारे देशातील दुसरे राज्य बनण्याचा मान मिळवला आहे.