>> मुख्यमंत्री ः १५ ऑगस्टपासून गरजूंना बायोटॉयलेटचे वितरण
गोवा राज्य ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत खुल्यावर शौचमुक्त (ओडीएङ्ग) राज्य घोषित करण्यात येणार आहे. राज्यातील गरजू नागरिकांना बायो टॉयलेट वितरण करण्याचे काम येत्या १५ ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत काल दिली.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या बायो टॉयलेटच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, राज्यातील पंचायत क्षेत्रात १७,१५० बायो टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागात ४ हजार टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. तसेच ओडीएङ्ग योजनेखाली पालिका आणि पंचायतीच्या प्रत्येक प्रभागात एक सार्वजनिक टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. मलनिस्सारण प्रकल्पाचे कनेक्शन घेणे बंधनकारक केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
एनजीटीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उघड्यावर सांडपाणी सोडणार्यांवर कारवाई करण्यासाठी आरोग्य खाते, पंचायतीने नोटीस पाठविण्यात आलेल्या लोकांना टॉयलेट बांधणीसंबंधीचे अर्ज भरावेत, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली.
राज्यातील पंचायत क्षेत्रातील नागरिकांना बायो टॉयलेट उपलब्ध करून देण्यासाठी पाच कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण विकास विभागाने पंचायत क्षेत्रात टॉयलेटसाठी केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचे आढळून आले आहे. या विभागाने ६० हजार टॉयलेट आवश्यक असल्याची माहिती दिली होती. नागरिकांकडून माङ्गक शुल्क आकारून बायो टॉयलेट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सामान्य वर्गातील नागरिकांकडून ४५०० रुपये, एसटी समाजातील नागरिकांकडून १ हजार रुपये आणि ओबीसी समाजातील नागरिकांकडून २ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
दर्जेदार बायो टॉयलेट
उपलब्ध करणार
सरकारकडून दर्जेदार बायो टॉयलेट उपलब्ध केली जाणार आहेत. किनारी भागात अनेक नागरिकांनी बायो टॉयलेट बसविली आहे. या बायो टॉयलेटचा योग्य अभ्यास करून लोकांना देण्यासाठी निवडण्यात आली आहेत. बायो टॉयलेटची किंमत ५८ हजार १८४ रुपये एवढी आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अभ्यास करून या टॉयलेटची शिङ्गारस केली आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.