‘गोवा सागरी परिषद’ परिसंवादाचे उद्घाटन

0
106
परिसंवादात मार्गदर्शन करताना नौदल प्रमुख सुनील लांबा.

पणजी
‘गोवा सागरी परिसंवाद-२०१८’ या दुसर्‍या परिसंवादाचे काल नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी उद्घाटन केले. आयएनएस मांडवी, वेरे येथे झालेल्या कार्यक्रमा दरम्यान नाविक युद्ध महाविद्यालयाच्या पत्रिकेचेही नौदल प्रमुखांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. भारतीय महाद्वीपाच्या क्षेत्रातील सर्व राष्ट्रांनी परस्पर सहकार्याने सागरी शांततेला प्रोत्साहन द्यावे, असे नौदलप्रमुख सुनील लांबा म्हणाले. भारतीय महाद्वीपात मजबूत सागरी भागीदारी निर्माण करणे ही यावर्षीच्या परिसंवादाची संकल्पना आहे.
भारत पूर्वीपासूनच सागराशी नाते असलेला देश आहे. आपली पाच हजार वर्षांपेक्षाही पूर्वीची सागरी संस्कृती आणि इतिहास आहे.
सागरी मार्गाने देशांमध्ये केवळ व्यापाराचे नाते नाही तर सांस्कृतिक संबंधही निर्माण झाले. त्यातही सागरी क्षेत्रात गोव्याचे अनन्यसाधारण महत्त्व पूर्वीपासूनच राहिले असल्याचे नौदलप्रमुख म्हणाले. जगाच्या लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या ही सागरापासून २०० नॉटीकल मैल अंतरावर आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेचे महत्त्व किती मोठे आहे, हे आपल्या लक्षात येईल, असे ते म्हणाले. आजच्या परिसंवाद झालेल्या चर्चेच्या आधारे प्रादेशिक व्यूहात्मक रचना आखता येईल, असे सांगत नौदलप्रमुखांनी शांततेसाठी परस्पर भागीदारीवर जोर दिला.
परिसंवादात ऍडमिरल डॉ. जयंत कोलोम्बगे (श्रीलंका,) श्रीमती जेन चॅन गीत यीन (सिंगापूर), कॅप्टन वर्गीस मॅथ्यूस (भारत), प्रो. दत्तेश परुळेकर (भारत), डॉ. जेबीन जॅकोब आणि रिअर ऍडमिरल सुदर्शन श्रीखंडे (भारत) यांच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.