राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत आपला कोणताच सहभाग नव्हता, असा दावा पत्रकार करण थापा यांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
गोवा विधानसभा निवडणूक तोंडावर आली असता, ऐनवेळी तृणमूल कॉंग्रेसने राज्यात प्रवेश केला. तृणमूलच्या प्रवेशानंतर राजकीय समीकरणे देखील बदलली होती. तसेच तृणमूलने मगोबरोबर युती करून गोवा विधानसभा निवडणूक लढवली.
गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी तुम्ही गोव्यात तंबू ठोकला होता, असे थापा यांनी मुलाखतीत म्हटले असता, त्यावर प्रशांत किशोर यांनी खळबळजनक विधान केले. दिल्ली, गोवा, महाराष्ट्र आदी कुठल्याही राज्यात मी राहू शकतो, त्याचा अर्थ मी तेथील निवडणुकीत सहभागी आहे, असे म्हणता येणार नसल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर मी कुठेही तशा प्रकारे काम केलेले नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
प्रशांत किशोर यांच्या या दाव्यानंतर तृणमूल कॉंग्रेसचे गोव्यातील नेते अचंबित झाले आहेत. मगोशी युती करण्यासह तृणमूल कॉंग्रेसने जे २६ उमेदवार रिंगणात उतरविले होते, ते ठरवण्यापर्यंत सगळे काही प्रशांत किशोर यांनीच केल्याचे तृणमूल कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे; मात्र, आता या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा अगदीच कमी यश मिळणार असल्याचे दिसून आल्याने प्रशांत किशोर हे या निवडणुकीत आपला कोणताही सहभाग नव्हता, असे सांगून आपली जबाबदारी झटकू पाहत असल्याचे तृणमूलच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.