गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापकांना धमकी

0
13

>> ‘त्या’ विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी संघटनेची निदर्शने

गोवा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठीचे काम पाहणाऱ्या विद्यापीठाच्या प्राध्यापकांना धमकी देणाऱ्या व त्यांच्या कामात आडकाठी आणणाऱ्या शिरीष परब व त्याच्या दोन साथीदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गोवा विद्यापीठ शिक्षक संघटनेने काल विद्यापीठाच्या आवारात निदर्शने केली.
या विद्यार्थ्यांच्या गुंडगिरीचा निषेध करणाऱ्या निवेदनावर विद्यापीठातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सह्या केल्या. गोवा विद्यापीठ शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामराव वाघ हे यावेळी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी शिरीश परब याने गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व सांस्कृतिक व्यवहार संचालनालयाच्या कार्यालयात घुसून तेथील कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती; मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे यासंबंधी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी अनेक वेळा तक्रार करूनही गुंडगिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांना राजकीय नेत्यांकडून अभय मिळत असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत नसावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यासंबंधी बोलताना एनएसयूआयच्या नेत्यांनी वरील तिन्ही विद्यार्थी हे अभाविपचे सदस्य असल्याचा आरोप केला.