गोवा विद्यापीठाचे मानांकन का घसरतेय? मुख्यमंत्र्यांचा सवाल

0
5

>> पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ पुरवूनही क्रमवारीत घसरण झाल्याने चिंता व्यक्त

राज्य सरकारने सर्व आवश्यक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेले असतानाही राज्यातील एकमेव गोवा विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावरील क्रमवारीत सातत्याने घसरण होत असल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट कुलगुरुंसमोरच काल चिंता व्यक्त केली. गोवा विद्यापीठाचे मानांकन का खाली घसरतेय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोवा विद्यापीठ रिसर्च पार्क युनिटचे (गुरू) काल उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, निबंधक प्रा. व्ही. एस. नाडकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवा विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांनी याचे आत्मपरीक्षण करून मानांकन घसरण्याची कारणे शोधण्याची गरज आहे. जर तसे झाले नाही तर अवघे 2-3 टक्के विद्यार्थीच संशोधक होतील. त्यामुळे राज्यात आणखी समस्या निर्माण होतील, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्यातील 50 टक्के विद्यार्थ्यांना जीपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांबद्दल माहितीच नाही आणि 80 टक्के विद्यार्थी अशा परीक्षांना सामोरे जाण्यास तयार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विद्यापीठातील ‘गुरू’ हे संशोधन केंद्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी संशोधन केंद्र ठरावे. या केंद्रामुळे राज्यात संशोधक वृत्तीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. राज्यात संशोधक तयार झाले पाहिजेत. अंदाजे 12.85 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेला हा उपक्रम गोव्याच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.