गोवा मुक्तीपूर्वीचे माझे अध्यापनकार्य

0
115

– नारायण विनू नाईक, मंगेशी

१९५२ साली मी मुंबईहून गोव्यात आलो. प्रथम माझ्या जन्मगावी म्हार्दोळ येथे आलो. काही दिवस तेथे वास्तव्य केले. गोव्यातील शैक्षणिक परिस्थितीचे निरीक्षण केले. विचारमंथन करून मनाशी पक्का निर्णय घेतला. मी ज्या पद्धतीने गोवा, कोल्हापूर, मुंबई येथे शिक्षण संपादन केले, त्या परिस्थितीला स्मरून समस्त गोव्यातील मुलांना शिक्षण देण्याचे ठरवले. लगेच मामाच्या गावी, म्हणजे बाणस्तारी – अडकोण येथे जाऊन थोडे दिवस राहिलो. तेथील गावकर्‍यांनी विनंती केल्याने बाणस्तारी येथील स्व. नामदेव फडते यांच्या घराच्या ओट्यावर मी मुलांना शिकवू लागलो. शाळा दुबार पद्धतीने चालू होती. सकाळी आठ ते अकरा व दुपारी तीन ते संध्याकाळी सहा अशी वेळ असे. इयत्तावार पन्नास पैसे ते दीड रुपये मुलांकडून मासिक फी मिळत असे. शिक्षकाला साठ ते सत्तर रूपये वेतन मिळे. शाळेत मुलांची संख्या वाढू लागल्यामुळे गावातील पालकांच्या सहकार्याने येथील मामाच्या जागेवर शाळा बांधून घेतली. ही शाळा म्हणजे छप्पर झावळ्यांनी शाकारलेल्या स्वरूपात होती. त्या शाळेत बाणस्तारी, अडकोण, तिवरे, भोम, धुळापी व मुस्लीमवाडा या ठिकाणची मुले शिकायला येत असत.

येथे शाळा बांधण्यापूर्वी तात्पुरती व्यवस्था येथील प्रसिद्ध देवस्थान श्री महिषासुरमर्दिनीच्या ओट्यावर मुलांना शिकवू लागलो. नंतर शाळा बांधून पूर्ण झाल्यावर तिथे शाळा सुरू करण्यात आली. वार्षिक श्री सरस्वती पूजनोत्सव मोठ्या थाटात व उत्साहात साजरा होत असे. तो पाच दिवस चाले.

काही पालकांच्या विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन मुलांना शिकवीत असे. त्याबद्दल शिक्षकांना दोन – तीन रुपये मिळत. येथील मुले शिकण्यास हुशार होती. आज ही मुले सरकारी व खासगी क्षेत्रांत विविध पदांवर कार्यरत आहेत. काही व्यापार – धंदा करीत आहेत.

म्हार्दोळ येथे नाईक फूलकार समाजाचे श्रीकृष्ण मंदिर आहे. त्या मंदिराची १९२८ साली स्थापना करण्यात आली होती. १९३५ साली या मंदिरात परिसरातील मुलांच्या सोयीसाठी मराठी शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. पोर्तुगीज राजवटीत मराठी शाळांना राजाश्रय नसल्यामुळे त्या लोकाश्रयावर चालत असत. त्याळेत वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, बांदा तसेच वेलिंग व म्हार्दोळ गावच्या शिक्षकांनी मुलांना अध्यापन केले आहे.

मी बाणस्तारी येथे शिकवत असताना म्हार्दोळ येथे आलो होतो. तेव्हा मुलांना शिक्षण द्यावे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी समाजाच्या सर्व सदस्यांची बैठक मंदिरात आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला विठू नाईक, दुलो नाईक, कृष्णा नाईक, विष्णू नाईक, बाबुली नाईक, वैकुंठ नाईक व बाबलो नाईक आदी सर्व सदस्यांची उपस्थिती होती. मला त्यांनी सांगितले की या शाळेत मुलांना शिकवण्यासाठी तुमची नेमणूक करतो. मी लगेच होकार दिला. ही शाळा शिक्षण खात्यात नोंदणीकृत होती. शाळेचा वार्षिक शैक्षणिक अहवाल, परीक्षा अहवाल यांची माहिती खात्याला पाठवत असे. समाजाची कार्यकारी समिती शिक्षकाला मासिक तीस रुपये वेतन देत असे. वेतनाकडे न बघता मुलांना सर्वोत्तम शिक्षण देणे हेच शिक्षकाचे मुख्य ध्येय. या शाळेत म्हार्दोळ, सीमेपायण, कानेरी, आकार वगैरे परिसरातील मुले येत असत.

शाळा दुबार पद्धतीने चाले. सकाळी आठ ते अकरा व संध्याकाळी तीन ते सहा पर्यंत वर्ग चालू असत. चौथीपर्यंत शिक्षणाची शाळेत सोय होती. काही मुले पाचवीत शिकण्यासाठीही शाळेत येत असत.

म्हार्दोळ येथील ज्येष्ठ शिक्षक रघुनाथ कार्लेकर यांनी मला सांगितले की नागेशी येथे जी शाळा आहे, ती सध्या बंद आहे. तुम्ही त्या शाळेत शिकवावे असे मला वाटते. त्यांच्या सूचनेप्रमाणे मी तयार झालो. प्रियोळ येथील शंभूनाथ शेणवी प्रियोळकर हे नागेश देवस्थानचे कमाविसदार होते. त्यांना कार्लेकर यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेला अनुसरून प्रियोळकर यांनी माझी त्या शाळेत नेमणूक केली. आधी देवस्थान परिसरातील आणि नंतर गुरववाडा, धोणशी, नावत, गाळशिरे या भागातील मुले येऊ लागली. मुलांची संख्या वाढू लागली. साठ ते सत्तर मुले शाळेत येत. नागेश देवस्थान शाळेला मदत म्हणून मासिक वीस रुपये द्यायचे. मुलांकडून मासिक फी ५० पैसे ते दीड रुपया असे. शिक्षकाला ७५ ते ८० रुपये मासिक वेतन मिळे.

या शाळेत बाक नव्हते. मुले गोणपाट घालून बसत. टेबल, खुर्च्या, फळा, घंटा, नकाशे वगैरे साहित्यहोते. गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान, चित्रकला व मोडी लिपी शिकवली जाई. पोर्तुगीज दुय्यम भाषा म्हणून शिकवण्याची सक्ती होती. मात्र त्या भाषेचे शिक्षण फक्त चौथीच्या मुलांनाच देण्यात येई. त्रिविक्रम धायमोडकर हे शाळेत येऊन मुलांना शिकवत असत. त्यांना सरकार वेतन देत असे.

गोव्याचे तत्कालीन गव्हर्नर जनरल व्हासाल द सिल्वा हे गोव्याच्या दौर्‍यावर असताना खासगी मराठी शाळांना भेट देत असत. असेच एकदा म्हार्दोळ येथील श्रीकृष्ण विद्यालयाला भेट देऊन त्यांनी तेथील मुलांचे व शिक्षकांचे खूप कौतुक केले होते. आपल्या गाडीतून आणलेली दप्तरे तेथील मुलांना वाटली होती. एकदा ते नागेश देवस्थानच्या भेटीसाठी आले. त्यांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. देवस्थानचा परिसर पाहिला. कार्यकारी समितीने त्यांना शाळेस भेट देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे शाळेत येताच प्रथम शिक्षकांशी हस्तांदोलन करून प्रेमाने मिठी मारली. नंतर शाळेची पाहणी केली. मग गाडीतून आणलेली दप्तरे मुलांना वितरीत केली. जाताना शिक्षकाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला.

भाऊसाहेब बांदोडकर यांची श्री नागेश महारूद्र व श्री महालक्ष्मी ही दैवते. ते वेळात वेळ काढून देवदर्शनास येत. एकदा असेच ते देवदर्शन करून चौकात बसले होते. मी रोज तेथील तळीवर आंघोळ करून देवदर्शन करून देवाला साष्टांग नमस्कार घालीत असे. त्या दिवशीही मी तसे केले. देवदर्शन घेऊन भाऊसाहेब बसले होते, त्या ठिकाणी बसलो. त्यांनी मला प्रश्न केला, ‘तू कुठला? येथे काय करतोयस?’ माझी परीक्षा घेण्यासाठी त्यांनी मला विचारले की, तू जो साष्टांग नमस्कार घातलास त्याचा अन्वयार्थ कोणता. ती अंगे कोणती? मी नम्रपणे त्या अंगांचा अन्वयार्थ सांगितला. ते खूष झाले. मग त्यांनी शाळेची, माझ्या पगाराची चौकशी केली. पगार पुरतो का? असे विचारले. मग शाळेतील साहित्याची त्यांनी चौकशी केली व जे साहित्य नसेल ते आपण देऊ, फक्त देवस्थानच्या कार्यकारी समितीची परवानगी घेऊन मला कळव असे सांगितले. मी काही दिवस प्रतीक्षा केली, पण काय चमत्कार, थोड्याच दिवसांत आपला गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. भाऊसाहेब मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.