गोवा मुक्तीच्या हीरक-महोत्सवानिमित्त राज्यात विकासकामे करणार ः मुख्यमंत्री

0
182
????????????????????????????????????

गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून राज्याला मिळालेल्या ३०० कोटी रु. च्या निधीतून राज्यभरात विकासकामे करण्यात येतील असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेखाली गोवा सरकारने ‘स्वयंपूर्ण गोंय’ ही योजना आखलेली असून त्या योजनेखाली गोव्यातील १९१ पंचायत क्षेत्रात विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दर एका पंचायतीच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतलेले आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रमोद सावंत सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसिद्धी खात्याने काल पर्वरी येथे विधानसभा भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्फे ज्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्या प्रकल्पांतून ३६ हजार नोकर्‍यांची निर्मिती होणार आहे. येत्या वर्षासाठी नव्या योजनांची आखणी करण्यात येणार असून पुढील वर्षापर्यंत नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही सावंत यांनी दिली.
कोविड महामारीमुळे मागचे वर्ष हे एकदम कसोटीचे वर्ष ठरले. मात्र या कसोटीच्या काळातही आपल्या सरकारने न डगमगता काम करीत विकास साधला. त्यासाठी सहकारी मंत्री व अधिकार्‍यांकडून पाठिंबा मिळाल्याने विकास साधणे सुकर झाल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी, मुख्यमंत्री सत्ताधारी आमदारांबरोबरच विरोधी आमदारांनाही बरोबर घेऊन राज्याचा विकास साधत असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर यांनी, प्रमोद सावंत या बहुजन समाजातील नेत्याने मुख्यमंत्री म्हणून राज्याचे खंबीर नेतृत्व केल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यानी केलेल्या दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरवात झाली.
यावेळी मंत्री विश्वजीत राणे, मायकल लोबो, गोविंद गावडे, माविन गुदिन्हो, दीपक पाऊस्कर, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, आमदार सुभाष शिरोडकर, एलिना साल्ढाणा, ग्लेन टिकलो, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव परिमल राय, माहिती-प्रसिद्धी खात्याचे संचालक सुधीर केरकर हजर होते.