गोवा मुक्तिदिन कार्यक्रम दिमाखदार करणार ः गावडे

0
224

>> आयोजन समितीच्या बैठकीत चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी झालेल्या गोवा मुक्तिदिन आयोजन समितीच्या बैठकीत १९ डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमाचा तपशील ठरवण्यात आला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार असलेला हा कार्यक्रम पंचेचाळीस मिनिटांचा असेल. त्यानंतर सुमारे दीड तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यात गोव्यातील १२० लोककलाकार सहभागी होणार असल्याचे या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाविषयी बैठकीत तपशीलवार चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम देखणा व दिमाखदार कसा करता येईल यावर चर्चा झाली. आज बुधवारी पुन्हा एकदा या कार्यक्रमासंबंधीच्या रुपरेषेला अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.

इफ्फी चित्रपट
कला अकादमीत
दरम्यान, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीचे चित्रपट यंदा कला अकादमीत दाखवण्याय येणार आहेत, असे गावडे यांनी सांगितले. परंतु उद्घाटन व समारोपाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणेच बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार असल्याचे गावडे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीवर कामत यांचा बहिष्कार
गोवा मुक्तिदिन सोहळा थाटामाटात व भव्यदिव्य अशा रितीने साजरा करण्यासाठी सरकारने हा सोहळा आयोजित करण्यासाठीचे कंत्राट एका ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीला देण्यासाठी निविदा काढल्याच्या निषेधार्थ गोवा मुक्तिदिन सोहळा आयोजनासाठीच्या उपसमितीच्या काल झालेल्या बैठकीवर आपण बहिष्कार घातल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.
गोवा मुक्तिदिनाचा हीरक महोत्सव थाटामाटात साजरा करण्याच्या सरकारच्या निर्णयाला राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी विरोधी दर्शविला आहे. राज्यावर कोरोनाचे सावट व संकट असताना अशा रितीने गोवा मुक्तिदिनाचा हीरक महोत्सव थाटामाटात व प्रचंड पैसे खर्च करून आयोजित केला जाऊ नये, अशी स्वातंत्र्यसैनिकांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे. आणि म्हणूनच आपण आजच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.
गोवा मक्तिदिनाचा हीरक महोत्सव थाटामाटात साजरा करण्याच्या सरकारी निर्णयाला आपला पाठिंबा नाही. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहून आपण सदर निर्णयाला पाठिंबा देऊ शकलो नसतो. आणि म्हणूनच आपण बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे कामत यांनी स्पष्ट केले आहे.