गोवा-मुंबई वंदे भारत रेल्वे आजपासून प्रवाशांच्या सेवेत

0
8

>> प्रतीक्षा संपणार; मध्यप्रदेशातून आभासी पद्धतीने पंतप्रधान करणार शुभारंभ

प्रवाशांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या गोवा ते मुंबई ह्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभ आज (मंगळवार दि. 27) रोजी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी सकाळी 10 वाजता मध्यप्रदेश येथून आभासी पद्धतीने झेंडा दाखवून ह्या रेल्वेगाडीचा शुभारंभ करणार आहेत.
मडगाव रेल्वे स्थानकावरील सकाळी 8.30 वाजता होणाऱ्या शुभारंभ सोहळ्याला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर व आमदार दिगंबर कामत उपस्थित राहणार आहेत.

ओडिशा येथे तीन रेल्वेंमध्ये अपघात होऊन जवळपास 300 प्रवाशी मृत्यूमुखी पडण्याची घटना घडल्यानंतर 3 जूनचा या रेल्वेचा शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर 26 जूनला या रेल्वेचा शुभारंभ होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, तो मुहुर्तही काही कारणास्तव टळला. आता अखेर 27 जूनला ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

गोवा-मुंबई दरम्यान पहिल्यांदाच वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे गोमंतकीयांच्या सेवेत दाखल होत आहे. ही रेल्वे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्याचे मडगाव रेल्वे स्थानक असा प्रवास करणार आहे.
या रेल्वेगाडीबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर, रांची-पाटणा आणि धारवाड-बंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचाही शुभारंभ करणार आहेत.

या रेल्वेचे आकर्षण अनेकांना असून, अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस ही ‘मेक इन इंडिया’ योजनेचा हिस्सा असलेली भारतातील ही पहिली इंजिनविरहित रेल्वे आहे. भारतातील ही पहिली सेमीहायस्पीड स्वदेशी वंदे भारत रेल्वे चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये तयार केली जाते. तंत्रज्ञानापासून ते प्रवाशांच्या सोयीपर्यंत ही रेल्वे अनेक प्रकारे आंतरराष्ट्रीय मानकांशी स्पर्धा करते. ही रेल्वे ताशी 180 ते 200 किलोमीटरचा वेग पकडू शकते. 16 डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे.