गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे राज्यपालांस साकडे

0
115

१५ मार्च २०१८ पासून बंद पडलेला राज्यातील खाण उद्योग सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावले उचलावीत यासाठी कामगार नेते पुती गावकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने प्रयत्न सुरू केले आहेत. गोव्यातील खाण अवलंबितांची वरील मागणी राज्याचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांच्या कानी घालावी, अशी मागणी फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी केली आहे.

राज्याचा आर्थिक कणा असलेला खाण उद्योग बंद पडल्याने राज्यातील सुमारे तीन लाख खाण अवलंबितांची जी दयनीय स्थिती झाली आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडताना खाण उद्योग बंद पडल्याने गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झालेला आहे तेही कोश्यारी यांनी मोदी यांना सांगावे, अशी विनंती गावकर यांनी केली आहे.

राज्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांना गोव्यातील खाण उद्योग बंद पडल्याने गोव्याच्या अर्थ व्यवस्थेवर काय परिणाम झालेला आहे त्याची चांगली जाण होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली होती, असे गावकर यांनी म्हटले आहे.

उद्या २६ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या खाणप्रश्‍नी सुनावणी होणार असून त्याकडेही गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले असल्याचे गावकर यांनी म्हटले आहे.