गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतीक्षा एन. खलप यांची काल नियुक्ती काल करण्यात आली. बीना नाईक यांनी गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या त्या स्नुषा आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील महिला काँग्रेस अध्यक्षांच्या नियुक्तीचा आदेश काल जारी केला. याशिवाय राजस्थान, गुजरात, मिझोरम, पुद्दुचेरी आणि अंदमान-निकोबादर ह्या प्रदेशांसाठीचे महिला काँग्रेस अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये सारिका सिंह, गुजरातमध्ये गीता पटेल, मिझोरममध्ये झोदिन लियानी, पुद्दुचेरीमध्ये ए. रहामुथूनिस्सा आणि अंदमान-निकोबारसाठी झुकेरा बेगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल डॉ. प्रतीक्षा एन. खलप यांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अलका लांबा, गिरीश चोडणकर, अमित पाटकर, माजी अध्यक्षा बीना नाईक आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे आभार मानले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी आणि तळागाळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.