गोवा भू-माफियांच्या विळख्यात!

0
12
  • बबन भगत

कॅसिनो माफियांबरोबरच राज्यात भू-माफियांचाही वावर वाढला. उत्तर गोव्यातील किनारपट्टी म्हणजे देश-विदेशांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक मौजेचे स्थळ म्हणून उदयास आली. अमली पदार्थ माफिया हे तिथे पूर्वीपासून होतेच. मात्र नव्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातील आणि विशेषकरून बार्देश तालुक्यातील जमिनींना सोन्याचा भाव आला. परिणामी राज्याबाहेरील भू-माफिया व रिअल इस्टेटमधील व्यावसायिकांची वक्रदृष्टी गोव्यातील जमिनीकडे वळली. त्याचाच परिपाक म्हणजे हे आगरवाडेकर प्रकरण होय!

कविवर्य बा. भ. बोरकर यांनी आपल्या ‘माझ्या गोव्याच्या भूमीत…’ या कवितेतून निसर्गसौंदर्याने भरलेल्या गोमंतभूमीचे सुंदर रीतीने गुणगान व वर्णन केले आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला गोवा म्हणजे भारतातील एक नंदनवनच. त्यामुळे गोव्याकडे पर्यटक आकृष्ट होऊ लागले, आणि राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू झाला. ऐंशीच्या दशकात मोजकेच पर्यटक गोव्यात यायचे. मात्र नंतर नव्वदच्या दशकात गोव्याचे पर्यटन कधी नव्हे एवढे वाढले. आणि 2000 सालापासून तर गोव्याच्या पर्यटनाला बहरच आला. बघता बघता गोवा हा पर्यटनासाठीचा एक मोठा ब्रॅण्डच बनला. भारतभरातल्या लोकांनाच नव्हे तर विदेशी पर्यटकांनाही गोव्यात पर्यटनासाठी यावे असे वाटू लागले. खासकरून देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घातली ती येथील समुद्रकिनाऱ्यांनी.

बॉलिवूडचे चित्रपट निर्माते तर सत्तरच्या दशकातही चित्रीकरणासाठी गोव्यात यायचे. नंतर 80च्या दशकात महानायक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांसह अन्य कित्येक मोठ्या चित्रपट कलाकारांच्या चित्रपटांचे चित्रीकरण गोव्यात होऊ लागले. 80च्या दशकात गाजलेल्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून तर गोवा असा काही चित्रीत करण्यात आला की त्या चित्रपटामुळे एकप्रकारे गोव्याच्या पर्यटनाचे मोठे प्रमोशनच झाले. मागच्या 10-20 वर्षांच्या काळात ‘गोलमाल’ व ‘सिंघम’ या फ्रँचायझी चित्रपटांचेही गोव्यात चित्रीकरण झाले. गोवा ब्रँड आणखी गाजण्यास त्याची फार मोठी मदत झाली. 2004 साली ‘इफ्फी’ गोव्यात आला आणि नंतर गोवा हे ‘इफ्फी’साठीचे कायम स्थळ बनले. त्याचाही पर्यटनवाढीसाठी फायदा झाला.

सुमारे 32 वर्षांपूर्वी गोव्यात पहिला तरंगता कॅसिनो सुरू झाला होता. नंतर कालांतराने आणखी पाच-सहा कॅसिनो मांडवी नदीत सुरू झाले. या कॅसिनो माफियांबरोबरच राज्यात भू-माफियांचाही वावर वाढला. उत्तर गोव्यातील किनारपट्टी म्हणजे देश-विदेशांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक मौजेचे स्थळ म्हणून उदयास आली. अमली पदार्थ माफिया हे तिथे पूर्वीपासून होतेच. मात्र नव्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातील आणि विशेषकरून बार्देश तालुक्यातील जमिनींना सोन्याचा भाव आला. मोठमोठे उद्योगपती, चित्रपट कलाकार, फॅशन दुनियेतील स्टार मॉडेल्स, क्रीडापटू अशा सर्वांनाच उत्तर गोव्यात आपली जमीन अथवा ‘सेकंड होम’ असावे असे वाटू लागले. परिणामी राज्याबाहेरील भू-माफिया व रिअल इस्टेटमधील व्यावसायिकांची वक्रदृष्टी गोव्यातील जमिनीकडे वळली. मग गोव्यातील जमिनी कशा गिळंकृत करता येतील याचे प्लॅनिंग भू-माफिया करू लागले. राज्यात कॅसिनो व्यवसाय सुरू केलेल्या दिल्ली व अन्य ठिकाणच्या बड्या धेंड्यांना उत्तर गोव्यातील जमिनी हव्याहव्याशा वाटू लागल्या. देशभरातील लोक उत्तर गोव्यातील जमिनी विकत घेऊ लागले. दिल्लीसह देशाच्या मोठ्या शहरांतील सधन लोक निवृत्तीनंतर गोव्यात येऊन स्थायिक होऊ लागले. त्यासाठी अर्थातच जमीन अथवा जुन्या घरांचा सौदा होऊ लागला. जमिनींची दलाली करणाऱ्या परप्रांतीयांकडून गोमंतकीय जमीनदारांच्या मुलांना लालूच दाखवून जमिनींचे सौदे केले जाऊ लागले. आसगाव हे सुंदर गाव तर हळूहळू परप्रांतीयांचेच होऊन बसले. तेथील जमिनी व जुनी घरे (पोर्तुगीजकालीन घरांसह) गर्भश्रीमंत परप्रांतीय मोठी रक्कम देऊन विकत घेऊ लागले. आसगावमधील कित्येक जमिनी भू-माफियांनी बळकावण्याच्या घटनाही घडल्या. राज्यातील काही छोट्या-मोठ्या नेत्यांच्या व राज्य प्रशासनातील काही लोकांच्या आशीर्वादानेच हे सगळे चालू असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मागच्या दहा वर्षांत जमीन घोटाळ्यांच्या 128 प्रकरणांची पोलिसांत नोंद झाली. त्यापैकी 73 प्रकरणे ही एकट्याच बार्देश तालुक्यातील पर्वरी, सुकूर व म्हापसा येथील होती. काही केंद्रीय व स्थानिक राजकीय नेते तसेच गोव्याच्या प्रशासनात राज्याबाहेरून आलेले आयएएस व आयपीएस अधिकारी यांनी भू-माफियांशी हातमिळवणी करून आपले उखळ पांढरे करून घेतले.

23 जून आणि प्रदीप आगरवाडेकर प्रकरण
बायरा-आल्तो, आसगाव येथे आपल्या एकमजली निवासी घरात कुटुंबीयांसह राहणाऱ्या प्रदीप आगरवाडेकर या कुळाचे अर्धेअधिक घर जेसीबीच्या साहाय्याने मोडून टाकण्याची घटना 23 जून 2024 रोजी घडली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण गोव्यात खळबळ माजणे साहजिकच होते. कारण बिहार, उत्तर प्रदेश अशा मागास व माफियांचे राज्य असलेल्या राज्यांत घडणाऱ्या घटनेसारखी ही गोष्ट होती. प्रदीप आगरवाडेकर यांचे घर हे काही बेकायदेशीर नव्हते. तसेच ते पाडण्याचा आदेश कुठल्याही न्यायालयाने दिलेला नव्हता. दांडगाई करून ते घर पाडण्यात आले होते, आणि त्यासाठी चक्क त्या हद्दीत असलेल्या हणजुण पोलीस स्थानकातील पोलिसांची मदत घेण्यात आली होती. हे घर पाडण्यासाठीची कारवाई सुरू करण्यापूर्वी घराचे मालक प्रदीप आगरवाडेकर व त्यांचा मुलगा प्रिन्स यांचे बाउन्सर्सनी अपहरण केले आणि प्रदीप आगरवाडेकर यांची पत्नी प्रिन्शा आगरवाडेकर यांच्या डोळ्यांदेखत त्यांचे घर मोडण्याचे काम हाती घेण्यात आले. ज्या भूखंडावर आगरवाडेकर यांचे घर उभे आहे ती जमीन क्रिस पिंटो यांच्या मालकीची असून त्यांच्याकडून जमीन विकत घेतलेल्या पूजा शर्मा या महिलेचा हे घर मोडण्याच्या प्रकरणात हात असल्याचा कथित आरोप आहे. स्थानिक पोलिसांच्या संगनमतानेच हे अर्धेअधिक घर पाडण्यात आले. हा सगळा कुंपणानेच शेत खाण्यासारखा प्रकार होता. अशा प्रकारे दांडगाई करून घर मोडण्याच्या घटनेचे पडसाद संपूर्ण गोवाभर उमटले. घडलेल्या घटनेने साक्षात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही अचंबित झाले. ही घटना दक्षिण भारतातील मसाला चित्रपटातील एखाद्या हिंसक दृश्यासारखी होती आणि या घटनेबद्दल विरोधकांनी प्रचंड संताप व्यक्त करीत राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याचा आरोप केला. तसेच या घटनेची तपशीलवार चौकशी केली जावी अशी मागणी केली. ज्या शिवोली मतदारसंघात ही घटना घडली त्या मतदारसंघाच्या आमदार डिलायला लोबो व त्यांचे पती व कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो हे दांपत्य सत्ताधारी पक्षातील असतानाही त्यांनी या घटनेविषयी आक्रमक भूमिका घेतली. आमदार डिलायला लोबो यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराची पाहणी केल्यानंतर आगरवाडेकर यांचे घर ज्या भाटकाराच्या जमिनीत आहे त्याच्याविरुद्ध तसेच घर मोडण्यासाठीचे काम हाती घेतल्यानंतर तेथे जे बाउन्सर्स हजर होते त्यांच्या विरोधात अपहरण व बेकायदेशीरपणे घर पाडणे असे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद केले जावेत, अशी मागणी केली.

वरिष्ठ आयपीएस अधिकारीच मास्टरमाईंड ः कार्लोस फरेरा
हळदोणा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार कार्लोस फरेरा यांनी तर आगरवाडेकर यांचे घर मोडण्याच्या घटनेत एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा हात असल्याचा सनसनाटी आरोप केला. तसेच या प्रकरणाची सरकारने निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना करून चौकशी करावी अशी मागणी केली. कार्लोस फरेरा यांनी केलेला आरोप म्हणजे एक बॉम्बगोळाच होता. या बॉम्बगोळ्यामुळे राज्याचे पोलीसप्रमुख असलेले पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचे आसन आता डगमगू लागले आहे. या एकूण प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार जसपाल सिंग यांनी हणजूण पोलिसांना आगरवाडेकर यांचे घर मोडले जात असताना तेथे सुरक्षा पुरवण्यासाठी हजर राहण्यास पाठवले होते असा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपामुळे सिंग गोत्यात आले असून त्यांच्या बदलीसाठी गोवा सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. बुधवारी सिंग हे दिल्लीला रवाना झाले, तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे त्यापूर्वीच दिल्लीला रवाना झाले होते. सिंग यांच्या बदलीचे संकेत मिळत असले तरी हा लेख लिहून होईपर्यंत त्यांच्या बदलीचा आदेश काही आला नव्हता. दरम्यान, या प्रकरणातील कथित मास्टरमाईंड असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नी पूजा शर्मा यांना आपणासमोर चौकशीसाठी हजर राहण्यास एसआयटीने समन्स बजावले असून शर्मा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतानाच विविध कारणे देत एसआयटीसमोर त्यांनी दिलेल्या तारखेला हजर राहण्यास असमर्थता दाखवली आहे. अटक व पोलीस कोठडी टाळण्यासाठी हे सगळे चालले असल्याचे उघड आहे.

प्रशाल नाईक देसाईंची सिंघमगिरी
राज्य सरकारच्या आदेशानंतर राज्याचे मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका हणजुण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रशाल नाईक देसाई, उपनिरीक्षक संकेत पोखरे व नितिन नाईक यांच्यावर ठेवल्यानंतर वरील तिघांनाही निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर निरीक्षक प्रशाल नाईक देसाई यांनी सिंघमप्रमाणे धाडस दाखवीत पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या आदेशानुसारच आम्ही सगळे काही केले होते असे लेखी उत्तर दिल्याने जसपाल सिंग अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना आता गोव्यातून आपला गाळा गुंडाळावा लागेल असेच दिसते. मात्र, राज्याबाहेरील ज्या आयपीएस अधिकाऱ्याच्या सूचनेवरून त्यांनी ही कारवाई केली होती त्या आयपीएस अधिकाऱ्यावर मात्र कारवाई होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.

आगरवाडेकर यांच्या घराची मोडतोड व त्यांच्या मुलासह त्यांचे करण्यात आलेले अपहरण हे प्रकरण सरकारने चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण पोलिसांकडे सोपवल्यानंतर या विभागाने तपासकामासाठी चार सदस्यीय विशेष चौकशी पथकाची स्थापना करून या प्रकरणी वाहन पुरवणाऱ्या अश्पाक शेख तसेच बाउन्सर्स महम्मद इम्रान सालमनी व आझिम कादर शेख यांना अटक केली.

तीन दिवसांनंतर तडतोड
घटनेच्या तीन दिवसांनंतर या प्रकरणातील प्रमुख संशयित पूजा शर्मा यांनी कुमार नामक एका मध्यस्थाला आगरवाडेकर यांच्याकडे पाठवून आम्ही समझौता करून हे प्रकरण मिटवू. तुमच्या मोडतोड केलेल्या घराची आम्ही दुरुस्ती करून द्यायला तयार आहोत. तसेच जमीन मालकाबरोबर जमीन विकत घेण्यासाठी आम्ही केलेले विक्रीपत्रही (सेलडीड) रद्द करू असा प्रस्ताव त्यांच्याकडून आम्हाला देण्यात आल्याचे सांगून आम्हाला सदर जमिनीवर परत आमचा हक्क मिळेल असे आश्वासन सदर मध्यस्थामार्फत मिळाल्याने आम्ही आता याप्रकरणी तडजोड करण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट करून प्रदीप आगरवाडेकर यांच्या पत्नी प्रिन्शा आगरवाडेकर यांनी सर्वांना धक्काच दिला. तसेच अपहरण प्रकरणात कथित आरोपी पूजा शर्मा यांचा हात नसल्याचा निर्वाळाही प्रिन्शा आगरवाडेकर यांनी दिल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. मात्र, स्थानिक आमदार डिलायला लोबो यांनी या तडजोडीला तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारने या प्रकरणाची फाईल बंद करू नये. या प्रकरणातील सगळी खरीखुरी माहिती जनतेसमोर यायला हवी. गोमंतकीय हे स्वाभिमानी आहेत आणि आमचा अशा प्रकारे झालेला अपमान आम्ही सहन करू शकत नाही. कुणी आम्हाला गृहित धरू नये, असे लोबो यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

तपासकाम चालूच राहणार ः मुख्यमंत्री
यावर गृहमंत्री या नात्याने बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोपी व पीडित यांच्यात जरी तडजोड झाली तरी गृह खात्याच्या वतीने या प्रकरणाचे तपासकाम चालूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर पीडित कुटुंबाला तडजोड करून प्रकरण मिटवायचे असेल तर ते त्यांना न्यायालयातच करावे लागणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही झाले तरी या प्रकरणाचे तपासकाम आता चालूच राहणार आहे हे स्पष्ट आहे. मात्र आरोपी व पीडित यांच्यात तडजोड झाल्यास ही ‘पोलीस केस’ दुबळी होण्याचा व न्यायालयात समझौता होऊन या प्रकरणातील सगळे आरोपी निर्दोष सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
भू-माफियांकडून भविष्यात राज्यात अशा प्रकारचे आणखी गुन्हे घडू नयेत यासाठी या प्रकरणाचा योग्य निकाल लागण्याची गरज असून सर्व आरोपींना शिक्षा व्हायला हवी, अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची राज्यातून बदली होणार का? या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा शर्मा यांना अटक होणार का? प्रदीप आगरवाडेकर यांचे अर्धेअधिक मोडलेले घर बांधून दिले जाणार का? जमिनीचे विक्रीपत्र खरोखरच रद्द केले जाईल काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे.