गोवा डेअरी अध्यक्षपदावरून दुर्गेश शिरोडकर यांना हटवले

0
9

>> अध्यक्षपदी डॉ. आगुस्तीन मिस्किता

कुर्टी फोंंडा येथील गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघाच्या (गोवा डेअरी) अध्यक्षपदावरून दुर्गेश शिरोडकर यांना हटविण्यात आले असून अध्यक्षपदी पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. आगुस्तीन मिस्किता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नवनियुक्त अध्यक्ष डॉ. मिस्किता यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. राज्य सहकार निबंधकांनी काल गुरूवारी हा आदेश काढला.

दरम्यान गोवा डेअरीच्या विद्यमान प्रशासकीय समितीने गोवा डेअरीचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल फडते यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करत त्यांनाही पदावरून हटवत त्यांच्याकडील ताबा काशी नाईक यांच्याकडे सोपवला आहे. काशी नाईक यांच्याकडे उसगाव पशुखाद्य प्रकल्पाचा ताबा असून आता नाईक यांच्याकडे गोवा डेअरीचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

दरम्यान, या समितीचे यशवंत कामत व अवित नाईक या दोघांनाही समितीवर ठेवण्यात आले आहे.
दुर्गेश शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवा डेअरीने नफा कमावला होता मात्र त्यांनी केलेल्या काही वक्तव्यामुळे दुखावलेल्या घटकांनी शिरोडकर यांना हटवण्यात आल्याच्या प्रतिक्रिया दूध उत्पादकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.