गोवा डेअरीची आर्थिक स्थिती गंभीर : फळदेसाई

0
22

गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघाला (गोवा डेअरी) वर्ष २०१९-२० या वर्षांत सुमारे १० ते १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोवा डेअरीची आर्थिक स्थिती गंभीर बनली असून, राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी काल गोवा डेअरीच्या आमसभेनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

गोवा डेअरीच्या नवीन संचालक मंडळाची अलीकडेच निवड करण्यात आली आहे. या संचालक मंडळाने कार्यकाळातील पहिली आमसभा कुर्टी-फोंडा येथे काल घेतली. या बैठकीत गोवा डेअरीच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. आमसभेने निवडलेल्या ऑडिटरमार्फत वर्ष २०१९ मधील आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी आमसभेत करण्यात आली.

गोवा डेअरीची प्रशासकाच्या काळात ऑडिट करण्यात आले नाही. त्यामुळे त्या काळातील ऑडिटबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासकाच्या कार्यकाळात गोवा डेअरीच्या दूध विक्रीमध्ये मोठी घट झाली. दुधाची विक्री ४० हजार लीटरपर्यंत खाली आली होती. गोवा डेअरीच्या नवीन संचालक मंडळाने ताबा घेतल्यानंतर दूध विक्री वाढीकडे लक्ष देण्यात आले आहे. अल्पकाळात सुमारे ८ हजार लीटर दूध विक्री वाढ करण्यात यश मिळाले आहे. येत्या सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत गोवा डेअरीच्या दुधाची विक्री ६० हजार लीटरवर नेण्याचे उद्दिष्ट आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.