म्हादई जलतंटा लवादाने आपला निवाडा यापूर्वीच दिलेला असताना आता कर्नाटकने गोव्याबरोबर न्यायालयाबाहेर तडजोड करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येड्डियुरप्पा व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात पुढील आठवड्यात या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एक बैठक होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी गोव्यात आलेले केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही म्हादई तंटा प्रकरणी गोवा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन चर्चा करावी व सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा, असे म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात ही बैठक होणार असल्याने तो चर्चेचा विषय ठरलेला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत म्हादई पाणीतंटा प्रकरणी म्हादई जललवादाने यापूर्वीच आपला निवाडा दिलेला असल्याने गोव्याने आता याप्रकरणी ‘आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट’ करण्याच्या भानगडीत पडू नये असे म्हटले होते. तसे केल्यास गोव्याचे नुकसान होऊ शकते असे त्यांनी म्हटले होते.
म्हादई पाणी प्रकरणी गोव्याने कर्नाटकशी बोलणी करून कोणतीही तडजोड करू नये, असे कामत यांनी म्हटले आहे.