हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शनिवारी येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर एटीके आणि एफसी गोवा यांच्यात लढत होत आहे. गोवा आघाडीवर, तर एटीके तिसर्या क्रमांकावर असल्यामुळे आघाडीसाठी चुरस असेल.
एटीकेला मागील सामन्यात केरला ब्लास्टर्सविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्यातून सावरण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. एटीकेला घरच्या मैदानावर केरला ब्लास्टर्सने गारद केले. त्यातच अँटोनिओ हबूास यांना शिस्तभंगामुळे पंचांनी बाहेर काढले. त्यामुळे या सामन्याच्यावेळी ते मैदानालगत उपस्थित राहू शकणार नाहीत.
एटीकेचे १२ सामन्यांतून २१ गुण असून गोव्यापेक्षा ते तीनच गुणांनी मागे आहेत. आघाडी घेण्याची संधी असल्यामुळे फॉर्मातील रॉय कृष्णा याच्या नेतृत्वाखालील आघाडी फळी धडाडेल अशी हबास याना आशा असेल. गोव्याच्या आघाडी फळीला सामन्यात मोक्याच्या क्षणी गोल पत्करावे लागतात असे दिसून आले आहे.
फिजीच्या कृष्णापेक्षा (८) केवळ अरीडेन सँटाना (९) यानेच जास्त गोल केले आहेत. कृष्णाची डेव्हिड विल्यम्स याच्याशी चांगली जोडी जमली आहे. विल्यम्सने पाच गोल आणि तीन असिस्ट अशी कामगिरी केली आहे. विल्यम्स मात्र दुखापतीमुळे सलग दुसरा सामना खेळू शकणार नाही. मध्य फळीतील एदू गार्सिया संघात परतण्याची अपेक्षा आहे.
गोव्याने १२ सामन्यांत २५ गोल करीत यंदाचा मोसम दणाणून सोडला आहे. फेरॅन कोरोमीनास याने आठ गोल केले आहेत. ह्युगो बुमूस याच्यासाठी चार गोल आणि तेवढ्याच असिस्टमुळे गोव्यातर्फे हा मोसम सर्वोत्तम ठरला आहे. तो मध्य फळीत आपले अस्तित्व सातत्याने जाणवून देतो. प्रतिस्पर्ध्याला रोखणे, चेंडू ताब्यात ठेवणे आणि पासेस अशा अनेक बाबतीत सर्जिओ लॉबेरा यांचा संघ साखळीत आघाडीवर आहे. सर्व सामन्यांत ते चेंडूवरील ताब्यासाठी वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील असतात.
एटीकेचा संघ बुमूस आणि कोरोमीनास यांच्यासह अहमद जाहौह यांना रोखण्यासाठी खोलवर संघरचना ठेवण्याची शक्यता आहे. अहमदचे मध्य क्षेत्रात भक्कम अस्तित्व असते. हबास हे खेळात वेगाने बदल करण्याशिवाय गोव्याला धक्का देण्यासाठी प्रतिआक्रमणावर भर देऊ शकतात. यंदा एकाच सामन्यात गोव्याला गोल करता आलेला नाही, पण एटीकेचा बचाव भेदणे अवघड असेल.