गोवा आरोग्य पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनविणार

0
18

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

>> जागतिक आयुर्वेद कॉंग्रेसचे कांपाल येथे उद्घाटन

गोवा हे आरोग्य पर्यटनाचे एक प्रमुख ठिकाण बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गोवा एक प्रमुख आयुर्वेद आणि आरोग्य पर्यटन केंद्र बनण्याची योजना आखत आहे. आरोग्य पर्यटन क्षेत्रात गोवा सर्वोत्तम बनवण्यासाठी सरकार उत्सुक आहे. धारगळ, पेडणे येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या केंद्रामुळे राज्यातील आयुर्वेदिक पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चार दिवसीय ९ व्या जागतिक आयुर्वेद कॉंग्रेस आणि आरोग्य प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना कांपाल, पणजी येथे काल केले.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पंजाबचे आरोग्य मंत्री चेतन सिंह जौरामाजरा, उत्तर प्रदेशचे आयुष मंत्री दया शंकर मिश्रा, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य कोटेचा, विज्ञान भारतीचे अध्यक्ष सुनील आंबेकर, सचिव प्रवीण रामदास, डब्लूएसीचे महासचिव अनुप ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यात आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. राज्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि आयुष इस्पितळ सुरू केले जात आहे. या संस्थेत पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये गोव्याच्या विद्यार्थ्यांना प्रवेशामध्ये ५० टक्के आरक्षण मिळेल. गोवा सरकारने गोव्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आयुष वेलनेस सेंटर सुरू केले आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाच्या खजिन्याची जाणीव करून देऊन भारताला जागतिक स्तरावर मोठे स्थान दिले आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच आयुष मंत्रालयाची स्थापना केल्याबद्दल आयुर्वेद आणि संबंधित औषधांच्या सर्व भागधारकांनी पंतप्रधानांचे आभारी राहिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

नवीन आयुष व्हिसाच्या व्हिजनसह परदेशातील रुग्ण भारतात येऊन सहज वैद्यकीय उपचार घेऊ शकतात आणि भारताच्या पारंपरिक औषधांचा लाभ घेऊ शकतात. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या आयुषच्या सर्व प्रमुख शाखा आहेत, ज्या भारतात प्रचलित आहेत. गोव्यातील लोकांनी या आरोग्य एक्स्पो आणि जागतिक आयुर्वेद कॉग्रेसमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

कोविड व्यवस्थापनात आयुषचे योगदान : कोटेचा
आयुष मंत्रालयाला कोविड महामारीच्या प्रभाव मूल्यांकनावर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ८९.९ टक्के भारतीय लोकसंख्येने कोविड महामारीमध्ये आयुष उपचार पद्धतीचा पर्यायी प्रतिबंध उपाय म्हणून वापर केला आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. आपल्या देशातील कोविड व्यवस्थापनात आयुषने बरेच योगदान दिले आहे. १४.२ दशलक्ष नमुने विचारात घेण्यात आले असून ते एकूण लोकसंख्येच्या १ टक्क्‌यांपेक्षा जास्त आहेत. मंत्रालयाने कोविड दरम्यानच्या काळात विविध विद्यापीठे, आयआयटी आणि संशोधन संस्थांच्या मदतीने १६० हून अधिक अभ्यासांची स्थापना केली होती, त्यांपैकी ५५ हून अधिक प्रकाशने बाहेर आली होती आणि काही पुनरावलोकन प्रक्रियेत आहेत, असेही कोटेचा यांनी सांगितले.

आयुर्वेदाला चालना : श्रीपाद
भारतामध्ये आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी २००२ मध्ये कोची येथे पहिली जागतिक आयुर्वेद कॉंग्रेस आयोजित करण्यात आली होती. आयुर्वेदाला भारतातील इतर पारंपरिक औषधांच्या पद्धतींसह एक जबरदस्त चालना मिळाली आहे. आयुर्वेदाची क्षमता आणि त्याच्या वेळच्या चाचणीत आधुनिक औषधी पद्धतींना बरे करण्याची आणि पूरक करण्याची अफाट क्षमता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.