गोवा आयटी हब बनविण्याचे उद्दिष्ट

0
208

>> स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सभापती डॉ. सावंत; ५ वर्षांत दहा हजारांना रोजगार

गोव्यात शांती, एकता आणि सर्वधर्मसमभाव अखंडित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपातळीवरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात बोलताना काल केले.

येथील जुन्या सचिवालयाजवळ राज्यपातळीवरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सभापती डॉ. सावंत यांनी ध्वजारोहण केल्यानंतर बोलत होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारावरील उपचारार्थ अमेरिकेत असल्याने राज्यपातळीवरील ध्वजारोहण करण्याचा मान दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आजच्या दिनी विचार व्यक्त करताना त्यांचे भाषण तुमच्यासमोर ठेवत आहे, असे सभापती डॉ. सावंत यांनी सुरुवातीला नमूद केले.

गोवा राज्य आयटी हब बनविण्याचे उद्दिष्ट असून पाच वर्षात १० हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. खाण उद्योग बंदीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती सभापती डॉ. सावंत यांनी दिली.
स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, बलिदानाची नित्य जाणीव ठेवण्याची गरज आहे. राज्याने साधन सुविधांच्याबाबतीत चांगली प्रगती साधलेली आहे. आरोग्य, शिक्षण, आयटी, पर्यटन या क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे. आयटीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी परराज्यात जावे लागणार नाही. आयटीचे नवीन धोरण जाहीर करून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील बेकार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य पाऊल उचलले आहे. सरकारी खात्यातील नोकरी भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत स्वयं रोजगार योजना राबविण्यात येत आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील खाण उद्योग बंद आहे. सरकारला खाण व्याप्त भागातील खाण बंदीमुळे फटका बसलेल्या कुटुंबीयांच्या समस्यांची जाण आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेऊन खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

साधनसुविधांसाठी केंद्राकडून
१५ ते २० कोटी सहाय
केंद्र सरकारकडून विविध साधन सुविधांच्या विकासासाठी १५ ते २० कोटींचे आर्थिक साहाय्य प्राप्त झाले आहे. मांडवी पुलाचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. झुवारी, तळपण पूल, मोपा विमानतळ आदी प्रकल्पाच्या कामांना गती देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मूल्यावर्धित शिक्षणास सुरूवात
राज्यात दर्जात्मक शिक्षण आणि सुसंस्कृत युवा पिढी निर्माण करण्यासाठी शाळांतून मूल्यवर्धित शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बांबोळी येथे सुपरस्पेशालिटी विभाग, विभागीय कॅन्सर केंद्राच्या कामाला चालना देण्यात आली आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
सरकारने प्लॅस्टिकच्या वापरावर बंदीसाठी पाऊल उचलले आहे. नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
स्वच्छतेच्या कार्याला गती देण्यात आली आहे. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवून २५० टन केली जाणार आहे. बायंगिणी, काकोडा येथे नवीन कचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सभापती डॉ. सावंत यांच्या हस्ते उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देऊन पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर, निवृत्त उपअधीक्षक रमेश गावकर, पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, पोलीस शिपाई झुबेर मोमीन यांचा सन्मान करण्यात आला. सभापती डॉ. सावंत यांनी ध्वजारोहणानंतर पोलीस पथकाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, आरडीए मंत्री जयेश साळगावकर, मुख्यसचिव धर्मेद्र शर्मा, पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर उपस्थित होते.

तिघा कैंद्यांची शिक्षा माफ
तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदी रघुनाथ नाईक (९१ वर्षे), मारियानो आर. जुझे डिसिल्वा (७३ वर्षे) आणि शिवय्या मारिहाल (६४ वर्षे) या तिघांचे वृद्धत्व व आजारपणामुळे शिक्षेत सूट देऊन शिक्षा माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भारतीय संविधानाच्या १६१ कलमाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सभापती डॉ. सावंत यांनी सांगितले.