गोवा अतिरेक्यांच्या रडारवर

0
81

बंगळुरू व अमृतसर पर्यटन स्थळांवरही हल्ल्यांचा धोका
देशातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेला गोवा तसेच बंगळूरू व अमृतसर अतिरेक्यांच्या रडावर असून या पर्यटन स्थळांवर अल-कायदा, आयएसआएस या कुख्यात अतिरेकी संघटनांकडून संयुक्तपणे भयानक साखळी हल्ल्यांचा धोका असून दक्षतेचा इशारा राष्ट्रीय सुरक्षा दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी दिला आहे. मात्र, हे हल्ले परतवून लावण्यासाठी सुरक्षा दल पूर्ण ताकदीनिशी सज्ज असल्याचे ते म्हणाले.देश-विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी खेचणार्‍या गोव्याला अतिरेकी संघटनांकडून प्रामुख्याने धोका असल्याचे श्री. चौधरी म्हणाले. गोव्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर अतिरेकी संघटनांकडून संयुक्तपणे हल्ल्यांचा संभव आहे. अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या रडारवर प्रथम गोवा, बंगळुरु आणि अमृतसर आहेत. या ठिकाणांची अतिरेक्यांनी रेकी केली आहे. असा हल्ला होणे हे शक्य आहे. कारण भारतात अनेक शहरांवर हल्ले करण्याची तयारी त्यांनी आधिपासून केली आहे. गोव्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची अल-कायदा सारख्या अतिरेकी संघटनेला चांगली माहिती असल्याने गोव्यातील पर्यटन स्थळांवर त्यांचा डोळा असल्याचे अतिरेकीविरोधी दलाचे राष्ट्रीय प्रमुख श्री. चौधरी म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना श्री. चौधरी म्हणाले की, अल-कायदा व आएसआएस या कुख्यात अतिरेकी संघटनांकडून संयुक्तपणे देशभरात अनेक ठिकाणी आत्मघाती हल्ले होण्याची दाट शक्यता आहे. अल – कायदा या अतिरेकी संघटनेने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची धमकी दिली आहे. हरकत – उल – मुजाहिद्दीन, जैश-इ-मोहम्मद, इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनांचा देशात वावर असल्याने या अतिरेकी संघटनांशी हातमिळवणी करून हल्ले घडवून आणण्याची दाट शक्यता आहे.
दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचे दिसत असल्याने आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. काश्मीरमध्ये ईद दरम्यान इसिस या दहशतवादी संघटनेचाही झेंडाही दिसून आला असून ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. अल-कायदा, इंडियन मुजाहिद्दीन, लश्कर आणि आयएसआयएस दहशतवादी यांच्यामध्ये संघटन वाढविण्यावर भर दिसत असून त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दल सज्ज असल्याचे एसएसजी प्रमुख श्री. चौधरी म्हणाले.
गोव्यात अतिदक्षतेचा इशारा
ज्यु समुदायाच्या गोव्यातील काही केंद्रांना अज्ञातांकडून धमक्या मिळाल्या असून त्यामुळे गोव्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गोवा पोलिसांनी राज्यातील सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षेत वाढ केली असून मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या सुरक्षेतही वाढ केली आहे.
पर्यटनस्थळे, रेल्वेस्थानके, विमानतळ तसेच अन्य महत्त्वाच्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गोव्याबरोबरच बंगळुरूलाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
केंद्रीय गुप्तचर खात्याला हरमल व हणजूण येथील छबाड म्हणजे ज्यूंच्या प्रार्थना स्थळांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे त्या ठिकाणी फौजफाटा ठेवण्यात आला आहे. विदेशी संस्थांचा वावर असलेल्या काही संस्थांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.