गोवन, प्रुडंट उपांत्यपूर्व फेरीत

0
129

दी गोवन आणि प्रुडंट संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत गोवा क्रीडा पत्रकार संघटना आयोजित विजय गाड चषक आंतर प्रसारमध्यम सीझनबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

कांपाल येथील सागच्या मैदानावर काल खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दी गोवन संघाने प्रसार भारती संघावर ७ गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना प्रसार भारती संघाने १० षट्‌कांत ९ गडी गमावत ५८ अशी धावसंख्या उभारली. दी गोवनच्या गंगाराम सावंतने ५ धावांत ४ तर दीपक च्यारीने ३ बळी मिळविले. प्रत्युत्तरात खेळताना दी गोवन संघाने विजयी लक्ष्य ३ गड्यांच्या मोबदल्यात ८.१ षट्‌कांत गाठले. गंगाराम सावंतने २९ तर अजय लाडने १९ धावा नोंदविल्या. गंगाराम सावंतची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
दुसर्‍या सामन्यात प्रुडंटने नवहिन्द पब्लिकेशनवर १५ धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना सचिन सुर्लकर (२५ धावा) व प्रणित नाईक (२१ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरवर ८५ अशी धावसंख्या उभारली. लक्षराज शेट्येने ११ धावा जोडल्या.

नवहिन्दतर्फे अनिरुद्ध राऊळने २ तर एकनाथ नार्वेकरने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात खेळताना नवहिन्द पब्लिकेशनला ४ गड्यांच्या मोबदल्यात ७० धावांपर्यंत मजल मारता आली. हर्षद सावंतने २६, अनिरुद्ध राऊळने नाबाद २२ तर किशोर कामतने १४ धावा जोडल्या. प्रुडंटतर्फे अविनाश जोशी, साईश केरकर, हनुमान भोसले व निरज प्रभू यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रुडंटच्या सतीश सुर्लीकरची सामनावीर पुरस्कारसाठी निवड झाली.
आजचे सामने ः तरुण भारत वि. पुढारी, स. ९.३० वा. प्रुडंट वि. गोवा दूत स. ११.३० वा. कांपाल मैदान.