गोरखपूर येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज इस्पितळातील सुमारे ७० बालकांच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेश राज्य सरकारने या इस्पितळाच्या बालक रुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. काफील खान यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्या जागी डॉ. भूपेंद्र शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी या कॉलेजचे प्राचार्य राजीव मिश्रा यांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले होते. मात्र कॉंग्रेसने या प्रकरणाचे तपासकाम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकसभा मतदारसंघात हे इस्पितळ असून गेल्या ७ ऑगस्टपासून आतापर्यंत ७०हून अधिक बालकांचा येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारांदरम्यान या बालकांना ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ही बालके मृत्यूमुखी पडल्याचे कारण दिले जात आहे. ही बालके जपानी मेंदूज्वराने आजारी होती असे सांगण्यात येत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात बालकांचे मृत्यू झाल्याने आदित्यनाथ सरकारवर टीकेचा भडीमार होत आहे.
इस्पितळ अधिकार्यांना आपण मदतीची गरज आहे काय असे विचारले होते. त्यावेळी त्यांनी तशी गरज नसल्याचे आपल्याला सांगितले होते असे ते म्हणाले.
मात्र त्यानंतर बालकांचे जे मृत्यू झाले त्याची चौकशी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केली जाईल व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आदित्यनाथ यांनी जाहीर केले.
‘त्या’ बालकांप्रती मीच सर्वांत संवेदनशील : आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा तसेच राज्याचे आरोग्यमंत्री सिध्दार्थनाथ सिंग यांच्या उपस्थितीत इस्पितळाला भेट दिली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्यनाथ म्हणाले, ‘त्या’ बालकांप्रती माझ्यापेक्षा अधिक आणखी कोणी संवेदनशील असू शकत नाही’. याआधी गेल्या ९ रोजीही त्यांनी इस्पितळाला भेट दिली होती.
प्राण वाचविणार्यालाच केले बडतर्फ
इस्पितळाचे बालक विभाग प्रमुख तथा नोडल ऑफिसर डॉ. काफील खान यांना बडतर्फ करण्यामागचे अधिकृत कारण देण्यात आलेले नाही. इस्पितळाला ऑक्सिजनचा पुरवठा संबंधितांकडून होत नसल्यादरम्यान डॉ. काफील खान यांनी स्वत: प्रयत्न करून विविध रुग्णालयांमधून ऑक्सिजन सिलिंडर्स मिळवून शंभरहून अधिक बालकांचे प्राण वाचविले आहेत असे असताना त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. डॉ. खान यांच्या या प्रयत्नांची माहिती रुग्ण बालकांच्या पालकांनीही माध्यमांना दिली आहे. त्यांनी हे प्रयत्न केले नसते तर मृतांची संख्या वाढली असती असेही त्यांनी सांगितले. स्वखर्चाने त्यांनी १७ सिलिंडर्स आणले होते.